या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौकट

चौकटीतून आत येताना
किती गर्दी
आत आल्यावरही
किती अडचण

आत आत जाताना
पुन्हा भेटत राहतात
चौकटीमागून चौकटी
वेगळ्या संदर्भात
खुज्या खुज्या होत जाणाऱ्या

चौकटी संपत नाहीत
मी मात्र होत जातो खुजा
हरएक चौकटीबरोबर वाकता वाकता

शेवटी जिथं थांबतो तिथंही
एक चौकट
काय काय बसवायचं
याच विवंचनेत
अडगळ तशीच ठेवून देतो
चौकटीत...
चौकट पुन्हा लहान
आणि मीही खुजा
अडगळ कवटाळून

आता अडगळ चौकटीबाहेर डोकावतेय
आणि मीही होतो

त्या अडगळीचाच एक भाग

कबुतरखाना / ५५