या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सौदागर

तुमच्या बाजारात पायाला चक्रं बांधून
भणभणा भटकलोय मी...

फिरताना लक्षात आलं
बाजारात तुम्हीच सगळे बसलाय
... सौदागर म्हणून
आणि तुम्ही सगळ्यांनी मलाच मांडलंय बाजारात
तुमच्या पध्दतीनं सजवून
एरवी ओळखीचं हसताना विलग होणारे तुमचे ओठ
फटाफट आकडे बोलतायत माझ्या लिलावाचे.
तुमच्या फायद्याच्या ऐपतीप्रमाणं.

मला उगाचंच अचेतन झाल्यासारखं वाटतंय...

तू पण बसलीय्स कोपऱ्यात ?
सावलीतसुध्दा तुला छत्री लागते ?
... अगं तुझ्याजवळ तर मी माझं आपलेपण, माझं सर्वस्व
ठेव म्हणून दिलं होतं...

असू दे ऽऽ, माणसाची वेळ असते...
निदान एवढं तरी कळू दे, काय दर लावलायस माझा ?

कबुतरखाना / ५७