या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रविशंकर

दूरदर्शनचा पडदा
रविशंकरची सतार
तल्लीन चेहरा
भावूक पाणावले डोळे
उदास हास्य

खोलीभर सुरांचे घोस लगडलेले
मंदिरातल्या विरक्त शांतीसारखे
...तरीही स्वच्छंद

संवेदक नाजूक कलामयी बोटे
तरल लहरती सतारीच्या तारांवर
एका अनावर लयीत
..लय ...नाद ...सूर ...ताल ...
माझेपण विसरलेला मी
सुरांचा एक गुच्छच झालेला !

...आणि अचानक
ध्वनिक्षेपक म्यूट
...मग नुसतीच दिसत राहतात
अनावर नाजूक बोटे लहरताना मुक्याने
आणि स्वरनिर्मितीच्या वेदनेने एकाच वेळी
व्याकुळ अन् हर्षित झालेला रविशंकरचा चेहरा
नुकत्याच प्रसूत झालेल्या मातेसारखा

खोलीभर वाढत जातो गोंगाट
वाढत जातं रवंथ...

चघळून चघळून चोथा झालेल्या विषयांचं

५८ / कबुतरखाना