या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हातामध्ये धरला टाक

हातामध्ये धरला टाक
गिरवत गेलो अक्षर अक्षर
दौतीमधल्या निळाईला
फुटला पान्हा अक्षर अक्षर
  आभाळी रंगांची पाखरं
  कागदावर नाचू लागली
  अर्थामधल्या आनंदाने
  डोळ्यांची पाखरं वाचू लागली
निळेपणात दडले होते
रंग किती, कसे सांगू
ज्ञाना, चोखा, तुकोबा तर
पोर होऊन लागले रांगू
  बाळपणातच गळून पडले
  अज्ञानाचे अवघे लक्तर
  दौतीमधल्या निळाईला
  फुटला पान्हा अक्षर अक्षर
अक्षर अक्षर वेचित गेलो
नश्वरतेचे आले भान
पेन घेऊन पेरत गेली
अन् शब्दांचे फुलले रान

कबुतरखाना / ६१