या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाखरांना वरून आदेश

पाखरांना 'वरून' आदेश
भर मोसमात गाणी न म्हणण्याचे
आणि वाऱ्यांना वरून बंदी
गंधित होऊन वाहण्याची
तेव्हापासूनच तू रंगवत असलेलं चित्र
अपुरं असल्याचं सांगण्यात आलं होतं खवचटपणे

कधी कधी तू रंगवत असलेल्या चित्रातल्या पाखरांना
मनमोकळं गाण्यासाठी कंठ देऊ शकत नाही याची खंत वाटते
 ... आणि तुझ्या चित्रातल्या मोसमातला फुलगंध
 रानभर करण्यातही मी असमर्थ...
माझ्या नेभळटपणाचीही मला नेभळट चीड येते

पण जेव्हा तू तुझं अपुरं चित्र दालनात मांडतेस लिलावासाठी
आणि त्याच्यातील खुब्या खुलवून सांगतेस
आपल्या रसिक ग्राहकांना
जे सदैव चित्रातल्या बहरांवरूनच भविष्य पाहतात
अशा वेळी माझ्या अस्तित्वाची मला शंका येत राहते
...तू मात्र शंका-कुशंकांच्या पलीकडे
तुझ्या नव्या चित्रात गाणारी पाखरं कशी असतील
आणि कसे असतील बहर सुवासिक फुलांचे
याची चर्चा उत्साहात करत राहतेस

कदाचित माझं पिंजऱ्यातलं जिणं तुला मान्य नसावं...
किंवा पिंजऱ्यात असूनही अजूनही मला पंख आहेत
ही अमान्य असावं
तुझ्या डाळिंबी हसऱ्या ओठांवरून
कोणतेच अंदाज बांधता येत नाहीत.

६२ / कबुतरखाना