या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देहधर्म...

आदिम काळापासून
धर्म-अधर्माचे सारे संकेत बाजूला सारत
देहधर्म वेळोवेळी बदलत आलाय प्रत्येक धर्म
कारण धर्मांचा पायाच घालत आला आहे देहधर्म

धर्मस्थळातले धर्म
नीतीच्या गप्पांना
अनीतीच्या झालरी लावतात रंगबिरंगी
आणि वावरतात दिमाखात
...लक्षावधींना अनैसर्गिक मृत्यूच्या कराल दाढेत
देणाऱ्या फसव्या दानशूरांसारखे धर्म...

आता प्रत्येकजण सांगू लागलाय
धर्म माझा वेगळा!
आणि जाती-पोटजाती झाल्या आहेत
डोईजड...धर्मबुडव्या

म्हणून देहधर्म, बदलत आला आहे आपला धर्म
श्रध्दांना फाटे फोडत.
आता श्रध्दाळू फाट्यांवर
लालसांचे चकवे,
धर्मस्थळे झाली आहेत
उल्हास वाढवणारी पर्यटनस्थळे
आणि श्रध्देच्या कोंबावर फुलले आहेत
चटपटीत पॉलिशवाले विलासी बाजार

विज्ञानाचा वापर अनिष्टतेचे
जतन करण्यासाठी...

आणि माणूसपणाचा भोळसट उपयोग

६४ / कबुतरखाना