या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रिय

तू गेल्यावर
कळून चुकले अवघे सारे
नश्वर आम्ही
तुझ्यात लपले ईश्वर सारे

तू गेल्यावर
दारावरल्या जुईफुलांनी
हुंदके आवरून हळूच केली
स्मृतिगंधाची हृद्य शिंपणी

तू गेल्यावर
जाण्या-येण्यामधले अंतर
श्वासा-श्वासामध्ये भेटती
मैलाचे जणू दगड निरंतर

तू गेल्यावर
असा अचानक होऊन वारा
आत्म्याच्या चिमटीत धुंडतो
व्यवहारी देहाचा पारा

तू गेल्यावर
आत्मे सारे समुद्र झाले
मौनामधली आर्त प्रार्थना
रिते रिते वाळवंट झाले

कबुतरखाना / ६९