या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहारा

हा कशाचा शहारा
अंगभर फुलून आला
आणि भाल्यासारखा उभा ठाकला
अंगावरचा केस न केस

कोंबडं आरवायच्याही आधी
खिन्न अपरात्री आकांतानं कलकलणाऱ्या कोकिळेला
...कसं आवरायचं

हा कशाचा शहारा...
अंगावर बाभुळबन पसरवतोय.

पात्रतेची लढाई
रोज लढता लढता
होश उडालेली नियत
अनाहूत बेछूट हल्ला चढवते
स्वत:वरच
प्रत्येक जखमेच्या खड्डयात
बेजान झालेल्या संगिनींचा खच
आणि रक्ताचा प्रत्येक थेंब
स्फोटकांचं गोदाम बनलेला
अशा हल्ल्यातून काय साधलं जातंय
कशाची जीत कुणाला हरवतेय

जिवाजिवांची मनं...युध्द क्षेत्रं
अंदाधुंद संशयाची वावटळं घेऊन फिरणारी
शहाऱ्यांचे भयोत्सव

जिवाजिवांच्या रोमारोमात

७० / कबुतरखाना