या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कलाकुसर केलेलं गोंडस शून्य

नखाएवढंसुध्दा उणं नाही बघा !
सगळ्या नुसत्या बेरजाच बेरजा
समस्तांच्या कल्याणाच्या

मात्र, इथे कुणाच्या इस्टेटीच्या
गुणाकारांच्या गुणाकारांना गुणलं जातंय
कोटी कोटी हाडामासांच्या इस्टेटींना भागून

मग मांडली जातात मालमत्तेची गणिती सूत्रं
अमूक कोटी रु. (क्ष) + अमुक अब्ज (य)
आणखी असेच हाताच्या बोटावर मोजता येतील असे
अधिक... उरलेले समस्त शून्याशी नातं सांगणारे
आणि या सूत्राची बरोबरी केलेली असते
एका भल्यादांडग्या गोंडस शून्याशी

यातले 'क्ष' कोण? 'य' कोण ?
आणि असे बरेच गुलदस्त्यातले कोण ?
हे फक्त त्या काळ्या लक्ष्मीच्या दारात
मुकादमी करणाऱ्या शासकांना आणि
शासकांच्या द्वारपालांनाच ठाऊक

आम्हा समस्तांना कौतुक असतं
फक्त त्या गोंडस शून्याचं
त्या शून्यालासुध्दा असते...
कलाकुसर केलेली आशेची

कबुतरखाना / ७५