या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धुकं...

या शहरात
साऱ्याच वाटा बुजत चालल्यायूत
अपरिहार्य धुक्यात
दूरपर्यंत पसरत चाललेत धुक्याचे लोट

हातावरच्या माणसाचा मुखवटासुध्दा
ओळखत नाही, मग त्याच्या डोळ्यातील भाव कसा समजणार ?
सगळेच चाचपडतात एकमेकांना
स्पर्शबधिर हातांनी

कुणालाच आठवत नाहीत परस्परांचे संदर्भ
फक्त आठवतो आंधळा लिंगभेद !
आणि मैथुनमग्नतेने सगळेच रंगवतात
जुना मुखवटा नव्या रंगात
पुन्हा पुन्हा मुखवटे फाटले तरी
मुखवट्यावर रंगरंगोटीची पुटं चढवली जातातच
सतत... सातत्याने...

सगळ्यांनीच आपला आत्मा लिंगभावात
जन्मत:च लिलावून टाकलेला धुक्याशी
आणि सगळेच सामील झालेले
धुकाळ वाटेवरच्या दिशाहीन मुसाफिरांच्या कळपात...

७६ / कबुतरखाना