या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माती

मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती
या मातीतून चैतन्याचे झरे वाहती गाती

चंद्रही माती, माती चांदणे, मातीची नक्षत्रे
इथे तिथे फिरती ही सारी या मातीची गात्रे

गंध मातीचा घेऊनी आली रंगबिरंगी फुले
फांदीफांदीवर मातीचे किलबिल गाणे झुले

ही चमत्कृतींची दुनिया सारी या मातीची किमया
तुझ्या नि माझ्यामधली नाती या मातीची माया

तू माती, मी माती, तरीही तुला मातीची आण
घाल गवसणी आभाळा परि पाय मातीचे जाण...

कबुतरखाना / ७७