या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अमजद अली...

आत्ता मी तुझी किरवाणीतली
विलंबित लय ऐकतोय...
दुःखाचा कोमल सुकुमारपणा तुझ्या सरोदवरील बोटांतून
जादूसारखा माझ्या कानांत... कानांतून धमन्यात
धमन्यातून साऱ्या शरीरभर अलवार झंकारतोय...

अमजद अली, दुःख किती सनातन आहे रेsss !
असाच छेडत रहा...
तू दुःख छेडतोयस पण तुझ्या आर्त स्वरांनी
माझ्या रोमारोमात
सुखाच्या कोवळ्या पालवीचे
धुमारे फुटू पहातायत...

डोळ्यातला थेंब मध होऊन साकळलाय माझ्या पापण्यांत
हुंदक्यांवर उदात्ततेच्या धुपाचा गंध रेंगाळतोय
अनाहूतपणे मी किती मोठ्ठा होत चाललोय तुझ्या स्वरार्ततेनं
या रोमांचांबरोबर... मला सांगताही येत नाही... अमजद अली !

तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, गोरोबा, कबीर, नानक, जोतिबा
गांधी, बाबासाहेब, मार्टिन ल्यूथर किंग, अब्राहम लिंकन, कार्ल मार्क्स
मदर तेरेसा, अण्णाभाऊ, बाबा आमटे, मेधा...
अशा कितीतरी माणसांच्यातलं माणूसपणाचं उदात्त दुःख
साजूक तुपासारखं तुझ्या स्वरांतून माझ्यासारख्या
चौकटीत अडकलेल्यांच्या मनात झिरपतंय !

अमजदअली... तू असेच छेडत रहा स्वरांचे आवर्त
आणि माझ्यासारख्या कलहग्रस्त बहुजनांना असाच
सनातन दुःखाच्या सुखमयी दुलईत लपेटून घे!

कबुतरखाना / ७९