या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आव

सारं जग समजल्याचा आव आणत
माझ्या श्वासांचं वादळ
मी तिच्या केसांत माळलं

सारं सोसल्याचा अपवाद सांगत
माझ्या अक्षम्य कण्हण्याचे प्रतिध्वनी
मी तिच्या कानात बांधले

साऱ्या साऱ्यांचा साक्षीदार म्हणवणारे
माझ्या डोळ्यांचे सताडपण
मी तिच्या दगडमनावर कोरले

आता मी माझी श्रध्दा
तिच्या कणाकणात शोधतोय
आणि तिने मात्र
आदिमायेचा आव आणलाय.

८२ / कबुतरखाना