या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन


मन नदीचं रे माझं
त्याला दोन दोन काठ
ऐल राहून पडेना
पैलतीरासंगे गाठ

खुळं ऐल मन ऐके
देवाचारी पैल कथा
परि सोडवेना त्याला
त्याची साधीसुधी व्यथा

कधी बुडवितो तुका
माझ्या डोहामध्ये गाथा
ऐल गोंधळाचा माझ्या
पैलावर भगवा जथा

ऐल गातात कोकीळ
मेघमल्हाराचे सूर
पैल नाचणारा मोर
झाला समाधीत चूर

ऐल पैल सांधताना
मीच झाली वाळवंट
झालो संसारपूजेत
कधी भक्त, कधी भाट


लहर लहर पाणी

कबुतरखाना / ८५