या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गफलत

पाखरांनो तुमचे पंख तुम्हाला
आनंदाच्या प्रदेशात घेऊन गेले,
हे... या शिशिर कडाक्यात
माझ्याच पायदळी झडलेल्या
पाचोळ्याइतकंच सत्य आहे...
  तुम्ही गेलात त्या प्रदेशात तरी
  वसंताचे संगमवारे पोहोचले असतील बहारीनं !

  तुमच्यातल्या एका साथीदाराचं कलेवर मात्र
  माझ्या पाचोळ्यात विदीर्ण पडलंय

तुम्हा आनंदाच्या वाटसरूंच्या प्रेमात पडू नये म्हणतात!
तुमच्या विरहातून वेदनांचे जन्म होतात...
  माझ्या निष्पर्ण हतबलतेनं मी
  त्याच्या कलेवरावर सावलीही धरू शकत नाही मित्रांनो
...तुम्ही त्याला सोडून कसे काय गेलात ?
इथं मात्र आख्यायिका जन्माला आलीय
त्याचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून!
  आख्यायिकांवर इतिहास जगत असला
  तरी पुढच्या मोसमात
  माझ्या बरबादीची गाणी
  गाऊ नका!...

  

कबुतरखाना / ८७