या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कविता का लिहायची ?

मुक्या आयुष्याच्या सोबतीनं
खुरडत चालणारे तुम्ही आम्ही
फारच मुके आहोत दोस्त... फारच

अरे आयुष्याला स्वतःचे पदर तरी
असतात अनेकरंगी, भावनांचे...
पण आपला पदर एकरंगीच,
तोही विटका...
ज्याचा स्वतःचा रंग कोणता होता
हे ज्याचं त्याला कळणं देखील अशक्य.

फक्त स्वप्नातच येतात रंगात,
आणि रंगवून जातात एका
शहाऱ्यासाठी हव्याहव्याशा. पण...
स्वप्न जगण्याची बोलण्याची
सवयच जेव्हा हासडून काढलीय...
...तेव्हापासून -

विटत गेलेयत आपल्या
एकपदरी आयुष्याचे रंग
आणि झडत गेलीय आपली जीभ
मूकपणे मुकेपण कवटाळून...

तू म्हणशील, मग हे तरी तू कुठून बोलतोस !
खरं सांगू दोस्त -
आदिमानवाला जरी तू ही अक्षरांची
लिपी शिकवली असतीस ना
तर त्यानं सुध्दा ही अक्षरं अशीच
नक्षीसारखी अंथरली असती
तुझ्या हृदयावर
आणि म्हणाला असता हसून...
कविता, का लिहायची कविता ?

कबुतरखाना / ९१