पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/115

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मग त्यात काय झालं? त्यांची आईच आहे ना ती?"
 काही वेळ काहीच न बोलता ती भाजी परतत राहिली. शेवटी तिच्या उत्तराची वाट पाहत तो अजून उभाच आहे असं पाहून ती चिडून म्हणाली, "केवळ त्यांना जन्म देण्यापलीकडे आई म्हणवून घेण्यासारखं काय केलंय तिनं?"
 धरम जरासा खिन्नपणे हसून म्हणाला, "आई म्हणवून घ्यायला फक्त मुलांना जन्म देण्याचीच गरज असते."
 "मला हिणवतोस?"
 "रागिणी, ह्याबद्दल मी तुला कधी दोष दिलाय?"
 ती ओशाळून म्हणाली, "नाही, खरंच नाही दिलास. कधी कधी मला असं वाटतं, की तुला नि:संतान ठेवल्याबद्दल तू माझ्यावर ओरडावंस, त्रागा करावास."
 "तसं केलं तर तुला बरं वाटेल?"
 "वाटेलही कदाचित."
 "मग ते पत्र-"
 "मी त्याबद्दल चर्चा करणार नाहीये धरम आणि मुलं आल्या आल्या त्यांना ते पत्र द्यायचं असलं तर तू देऊ शकतोस. मी काही तुला थांबवू शकत नाही. फक्त तू तसं करू नको म्हणून विनंती करू शकते."
 त्यानं तिच्याकडं बराच वेळ नुसतं पाहिलं नि तो स्वैपाकघरातनं निघून गेला. मनावरचं ओझं दूर झाल्यासारखी रागिणी कसलं तरी गाणं गुणगुणत पुन्हा कामाला लागली.
 तिचं गुणगुणणं सहन न होऊन तो पुन्हा बाहेर गेला. कशासाठी गुणगुणते ही! दूरचा विचारच न करता तात्कालिक गोष्टींत आनंद मानून तृप्त आयुष्य जगण्याची हातोटी हा गुण आहे की दोष?
 बागेत काही काम करण्याइतकं दिसत नव्हतं म्हणून तो नुसताच फाटकाशी उभा राहिला. त्याला वाटलं, हे हळूहळू अंधारात जाणारं गुलाबी आकाश. त्वचेला सुखावणारी दमट-गार हवा, डोक्यात भिनणारा रातराणीचा वास, हे एवढंच फक्त आयुष्यात असायला हवं होतं. पण ह्या सगळ्या संवेदनांना बोथट करणारी ती दुसरी जाणीव बोचकारे काढीतच राहायची. वर्तमानपत्रं मुकी होती तरी कानावर येणाऱ्या सगळ्याच बातम्या अफवा म्हणून उडवून लावता येत नव्हत्या. आणि त्याहूनही भयानक होती ती स्वत:च्या नाकर्तेपणाची

कमळाची पानं । ११५