पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/143

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "हो."
  "तू एकटीच प्रवास करत्येयस?"
 "मी एका ग्रुपबरोबर इथे आले. काही दिवस आम्ही एकत्र हिंडलोफिरलो, पण शेवटी ज्याने त्याने आपल्या मार्गानं जायचं ठरवलं. पण त्यांच्याकडून मला मदत मिळाली नसतीच. तुमच्याकडे मागायला खरं म्हणजे लाज वाटते मला. मी कोण, कुठली? माझ्यावर का म्हणून विश्वास टाकावा तुम्ही? पण मी नक्की पैसे परत करीन तुमचे. मी वडिलांना लिहिलंय, पण त्यांनी पाठवलेले पैसे यायला वेळ लागेल. ते आले, की लगेच मी परत करीन तुमचे. मला तुमचा पत्ता तेवढा द्या."
 डोकं न उचलता तिनं नुसते डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या लांब सरळ पापण्या जवळजवळ तिच्या भुवयांना टेकल्या. त्याला थोडसं हसू आलं कारण तिचा चेहरा लहान मुलासारखा पारदर्शी होता. त्यातून तिचा खोटेपणा लपू शकत नव्हता. तिचे पैसे खरंच चोरीला गेलेही असतील. तिच्यासारखी माणसं पैसे, सुरक्षितता याबद्दल पूर्णपणे बेफिकीर असू शकतात. पण तिचे वडील तिला पैसे पाठवणार आणि ती ते परत करणार यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
 "मी तुला फारसे पैसे देऊ शकणार नाही."
 "जेवढे देता येतील तेवढे द्या. मला अगदी थोडे पैसे खूप दिवस पुरतात."
 "धर्मशाळांत राहून आणि उपास काढून?"
 ती नुसतीच हसली. त्यानं कोटाच्या आतल्या खिशातून पैशाचं पाकीट काढलं. त्याचा खोटेपणा तिच्या लक्षात आला असलाच पाहिजे. त्यानं विचार केला, माझ्या जे मनात आहे, ते करायला ही एवढीच वेळ आहे. तिला पैसे देताना तिच्याभोवती सहज सहज म्हणून बाहू लपेटून तिला मिठीत घेतलं तर काय होईल? ती दूर लोटून देईल? मिठीत तिच्या शरीराचा स्पर्श कसा वाटेल? ती खूप काटकुळी होती. कुडत्याखाली तिच्या खांद्याची हाडं उठून दिसत होती. तिचे स्तन इतके किरकोळ होते, की त्यांचा उठाव कपड्यांतून फारसा दिसतही नव्हता. तिला कुठेच काही गोलाई नव्हती आणि तरीसुद्धा तिच्यात स्त्रीत्वाचं आव्हान होतं.
 क्षणभर तो अडखळला. दुसऱ्या क्षणी त्याच्या हातातले पैसे जणू जादूने तिच्या हातात गेले. ती ते घेऊन उभी राहिली होती, त्याचे आभार मानीत होती आणि खोलीबाहेर जात होती. आणि हे सगळं होईपर्यंत तो जागच्या

कमळाची पानं । १४३