पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/144

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागी खिळल्यासारखा उभा होता.
 तो स्वत:शी जरा खिन्नपणे हसला. जाऊ दे. असं करणं मला जमलं नसतं, पचलं नसतं. मग हातची संधी घालवली म्हणून चुटपुट लावून कशाला घ्यायची?
 संध्याकाळी तो पुन्हा एकदा जुन्या शहराच्या अवशेषांत हिंडायला गेला. आता त्याला ते जास्त जवळचे वाटले. त्याला वाटलं, कदाचित मी गेल्या जन्मी इथे एखादा सरदार अंमलदार असतो आणि ती माझ्या मनात भरली असती तर तिला माझ्याकडे घेऊन यायला मी माझ्या सेवकांना फर्मावलं असतं.
 ती दिसेल असा विचारही त्याला शिवला नव्हता.
 तेव्हा ती दिसल्यावर तो एकदम दचकला. तिला आपण दिसू नये म्हणून चटकन दोन पावलं मागे सरून तो एका खांबाच्या आडोशाने उभा राहिला. तिच्या शेजारी एक पुरुष झोपला होता. ती त्याला चमच्याने काही तरी भरवीत होती. तो खूपच आजारी दिसत होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि डोळे खोल गेले होते. त्यांच्याजवळ त्यांच तुटपुंजं सामान पडलं होतं म्हणजे त्यांनी इथेच मुक्काम केलेला दिसत होता. तिचं त्या पुरुषावर लक्ष इतकं केंद्रित झालं होतं, की ती आजुबाजूच जग विसरली होती. एकदा त्याला वाटलं, की पुढे होऊन त्यांची चौकशी करावी, पण कुठे त्या लफड्यात पडा म्हणून त्याने काढता पाय घेतला.
 हॉटेलात परत आल्यावरसद्धा तो त्यांच्याबद्दल विचार करीत होता. का ही तरुण मुलं असं करतात? चांगलं घरदार, सुखसोयी, सुबत्ता सोडून ती गरिबी, आजार, घाण यांच्याशी मुकाबला करायला या देशात कशाला येतात? काय मिळतं त्यांना त्यातून? चित्तशुद्धी? आत्मिक समाधान? ते शरीराला क्लेश देऊनच मिळतं का? एकपुती रडे न् सातपुडी रडे असलाच मामला होता. त्याला कुणी अमेरिकेत नोकरी देऊ केली असती, तर तो एका पायावर गेला असता आणि त्यांचं तिथल्या आयुष्यात राम वाटत नाही म्हणून इथे येणं हाही एक प्रकारचा भोंदूपणा असतो. खरं दैन्य त्यांनी अनुभवलेलं नसतं म्हणूनच ते असलं साहस करायला तयार होतात त्यांना पुरेपुर माहिती असतं, की ज्याच्याकडे आपण पाठ फिरवली ते तिथंच आहे आणि ज्या क्षणी आपण परत जाऊ त्या क्षणी आपण पुन्हा त्याचा अंश बनू शकतो.

कमळाची पानं । १४४