पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/162

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तिच्याबद्दल आपण पुन्हा पुन्हा विचार करतोय हे रणजितच्या लक्षात आलं. पण का ते त्याला कळेना. तसं तिच्यात काहीच खास नव्हतं. ठेंगणा, किंचित स्थूलपणाकडे झुकणारा बांधा, साधीशी साडी नीटनेटकी नेसलेली, अंगभर ब्लाउज, पाठीवर एक वेणी, रंग नितळ गव्हाळ होता, पण नाकीडोळी विशेष नीटस होती असंही नाही. पण हे थेट तुमच्या डोळ्यांत बघून हसणं मात्र लोभावणारं. आणखी म्हणजे तिच्या डोळ्यांत एक आत्मविश्वासाची, थोडीशी बेडरपणाची चमक होती. ह्या मुलीला आयुष्य सहसा हरवू शकणार नाही असं बघणाऱ्याला वाटावं अशी.
 पावशेर खिळे, नाही तर एक काढणी, बाहेरगावी पाठवायच्या भाजीच्या पोत्यांवर नाव रंगवण्यासाठी रंगाचा छोटा डबा असल्या फुटकळ वस्तू घेण्यासाठी रणजित जेव्हा दुकानात खेटे घालू लागला तेव्हा अनुजा जरा सावध झाली. सुंदर किंवा त्याहीपेक्षा स्मार्ट, नखरेल नसल्यामुळे कॉलेजात मुलांनी मारलेल्या शिट्या, अश्लील शेरे, ओळख करून घेण्यासाठी शोधलेले बहाणे असल्या गोष्टींना तिला तोंड द्यावं लागलं नव्हतं. इतर मुली अर्धवट रोषाने अर्धवट कौतुकाने असा काही अनुभव सांगायच्या तेव्हा ती धरून चालायची की ती असले अनुभव येणाऱ्यांतली नव्हती. त्याबद्दल तिला खंतही नव्हती. कॉलेजात मुलांबद्दल ती फारसा विचारही करीत नसे. भविष्याविषयी विचार करताना अभ्यास, चांगले मार्क, बी.ए., कदाचित पुढे बी.एड. आणि शिक्षिकेची नोकरी इथपर्यंत तिची मजल जायची. क्वचित लग्न-संसार ह्यांबद्दल तिच्या मनात विचार येत. आपला नवरा होणारा पुरुष कसा असेल किंवा कसा असावा ह्याची फारशी स्पष्ट कल्पना तिला नव्हती. तरी पण आपल्या आई-वडिलांचं आहे त्यापेक्षा त्याचं आपलं नातं वेगळं, जास्त जवळचं, जास्त मैत्रीचं असावं असं तिला वाटे. त्या दोघांत फारसा संवाद नव्हता. त्यातून कधी कधी तिचे वडील दारू प्यायचे, आईशी भांडायचे, क्वचित मारायचे सुद्धा. नवऱ्यानं बायकोशी असंच वागायचं असतं आणि तिनं ते मुकाट सहन करून घ्यायचं असतं हे ती स्वीकारू शकत नव्हती.
 रणजित दुकानात यायचा, काही बाही खरेदी करायचा, चार गप्पा मारायचा इथपर्यंत तिला आक्षेप घ्यायला काही जागा नव्हती. पण एक दिवस ती दुकान बंद करून घरी जायला निघाली तर तो कोपऱ्यावर उभा होता. चल, तुला घरी सोडतो म्हणाला. ती म्हणाली नको, जवळ तर आहे, मी रोज जातेच का चालत. मग तो मोटारसायकल तिथेच सोडून तिच्या बरोबर निघाला. तिचा

कमळाची पानं । १६२