पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकांतला तो एक होता. त्या दिवशीच्या जुनाट कालबाह्य समारंभानं मी ज्या कुटुंबाचा घटक बनले होते, त्या कुटुंबाच्या संबंधितांतला एक. ह्यापेक्षा काही नाही.
 नंतर त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याच्या बाह्य स्वरूपाइतकं त्याचं अंत:स्वरूप सामान्य नाही असं मला आढळलं. तो बहुतेक संध्याकाळी आमच्याकडे यायचा, फारसे आढेवेढे न घेता जेवायला थांबायचा आणि न चुकता स्वैपाकाची तारीफ करायचा. पहिल्यापहिल्यांदा आम्हा दोघांत सदैव येणाऱ्या ह्या आगंतुकाचं काय करायचं असा मला प्रश्न पडे. पण नरेंद्रला त्याचं काही विशेष वाटत नव्हतं, नि हळूहळू मलाही त्याची सवय झाली दुसऱ्यातलं चांगलं काय असेल त्याचा शोध घेण्याची कला काहींना असते. त्यांच्या सहवासात असलं म्हणजे आपल्यात काहीतरी विशेष चमक आहे असं आपल्याला वाटतं. शेखर अशा माणसांपैकी होता. एरवी आतल्या गाठीचा आणि अबोल वाटणारा नरेंद्र, शेखर आला की मोकळपणा, बोलायचा, हसायचा. त्यामुळेच की काय, शेखरचा राग न करायला शिकले.
 त्या दोघांच्या गप्पा बरेचदा त्यांच्या इंग्लंडमधल्या वास्तव्याबद्दल असत नरेंद्र नेहमी 'गेले ते दिवस' अशा हुरहुरीने बोले, शेखर उपहासाने बोले. मला दोघांच्या वेगवेगळ्या सुरांतून एकच हळुवार भावना ऐकू यायची. ते बहुतेक करून इंग्रजीतच बोलायचे. माझ्या मनात एकदा शेखरला विचारायचं होतं की गोऱ्या साहेबाच्या भाषेचा वापर करणं हेही एक न्यूनगंडाचंच लक्षण नाही का म्हणून. पण ते राहूनच गेलं.
 नरेंद्र आणि शेखरची घरं शेजारी-शेजारी होती. शेखर नरेंद्रपेक्षा बराच मोठा, तेव्हा ओघानंच तो नरेंद्रचा हीरो बनला असला पाहिजे. आपल्याबद्दल अशी भावना असणाऱ्या लहान मुलांविषयी मोठ्या मुलांना बहुधा तुच्छता वाटते. पण शेखरनं नरेंद्रची भक्ती कधी तुच्छ लेखली नाही, म्हणून त्यांची मैत्री होऊ शकली. ते लंडनमध्ये बरेच दिवस एकत्र होते. नरेंन्द्र स्कूल ऑफ इकनॉमिक्समधे जात होता. शेखरचं शिक्षण खरं म्हणजे झालं होतं, पण एकामागून एक सबबी काढून तो परत येणं लांबणीवर टाकत होता, आणि कुठंतरी शिकवायचं, वर्तमानपत्रांसाठी लेख लिहायचा, बी. बी. सी. च्या मराठी कार्यक्रमात भाग घ्यायचा, असले उद्योग करून पोट भरीत होता. ते दोघं एकाच फ्लॅटमध्ये राहात होते आणि नरेंद्रचं शिक्षण

कमळाची पानं । ३२