पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/42

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उतरुन येणाऱ्या एकाला विचारलं तर तो म्हणाला, "दर सात वर्षांतून एकदाच फुलते कुरुंजी."
 -म्हणजे ह्या वर्षी नाहीच.
 माझ्या पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं झालं. का? त्या वेळी होतं तसंच्या तसंच सगळं पुन्हा अनुभवायचं म्हणून का मी इथे आले? पण तुकडे सांधून चित्र जुळवायला सगळे तुकडे तरी कुठे माझ्या हातात होते? घडतात त्या वेळी आपल्या लेखी ज्यांना महत्त्व असतं अशाच गोष्टी नंतर आपल्याला आठवतात. त्या वेळच्या कूर्गच्या प्रवासात नेमकं काय काय केलं, कुठे कुठे गेलो, काय पाहिलं- काही आठवत नव्हतं मला. आठवत होता तो फक्त लाल मातीवर पडलेला गुलमोहराच्या फुलांचा लालचुटूक सडा. कुरुंजीच्या फुलांचा धुंद करणारा वास. जंगलातली हिरवी शांतता. त्या वेळच्या माझ्या मनोवृत्तीला स्पर्श करणाऱ्या गोष्टी. माझं नेहमी असंच. स्वत:च्या बाहेर मी जाऊ शकत नाही म्हणून वाटणारा अपराधीपणा का बोचला?
 पण आईबाप नि मुलं ह्यांच्या संबंधात हा अपराधीपणा अभिप्रेतच असतं. तिथं संबंध तोडणारं, टाकून जाणारं मूल असतं. मी तिचं शेवटच मूल. तिच्या-माझ्यात एक खास जवळीक होती. मला वाटायचं, आता माझं लग्न झालं की तिला फार एकटं वाटणार. मग लग्न झालं. मी माझ्या संसारात सुखावले. दिवसन् दिवस तिची आठवणही यायची नाही, आणि मग एकदम आली आठवण म्हणजे असंच कुठेतरी खुपायचं. ती गेली तेव्हा वाटलं, फार उशीर झाला. तिला काही द्यायचं राहिलं असलं तर आता राहूनच जाणार. तिनं सुद्धा अगदी हुलकावणी दिली. निरोप घ्यायलाही सवड दिली नाही.-मग इथं काय मी तिचा निरोप घ्यायला आले? नाही, खरं तर तसंही नाही. निरोप कधीच घेऊन झाला. ती नसणं अंगवळणी पडलं तेव्हा.
 मी त्या मागल्या वेळी होते त्यापेक्षा वसू फारच लहान आहे. ती डोंगर चढताना पुढे पळे, मागे येई, पुन्हा पुढे जाई. कुत्र्यासारखी. ती आमच्या दुपटीने चालत असली पाहिजे. मधेच मागे येऊन विचारलंन,
 "आई, किती राहिलंय अजून?"
 "आता थोडंच असेल. दमलीस का?"
 वेगाने श्वास घेण्यासाठी स्फुरलेल्या नाकपुड्या आणखीनच फुगवून जोरजोरात मान हलवली.
 हळूहळू मोटारचा रस्ता दिसायला लागला. मग कडेने उभ्या राहिलेल्या

कमळाची पानं । ४२