पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/54

हे पान प्रमाणित केलेले आहे.

काहीही न दाखवता सदैव एक मख्ख मुखवटा घालून वावरायचं ही कल्पना असह्य होती. तिच्यावरच मन रेंगाळत होतं म्हणून माझा मला राग आला पण मी त्या मनावर ताबा मिळवू शकत नव्हते.
 मी बिछूला म्हटलं, 'तसा थांबण्यात काही अर्थ नाही म्हणा! फक्त डिसेंबरमध्ये मी इथं नाही आहे.'
 'नाही आहेस म्हणजे काय?' त्याच्या आवाजाचा एकदम स्फोट झाला. तो ऐकून मला बरं वाटलं. खरं म्हणजे ह्या कॉन्फरन्सबद्दल त्याच्याजवळ बोलले होते, पण आता पुन्हा सांगितलं.
 'अस्सं,' तो म्हणाला. काय प्रतिक्रिया दाखवायची ते त्याला कळत नव्हतं.
 मग मीच म्हटलं, 'तशी मी इथं असण्याची काही गरज नाही ना?'
 'तसं म्हटलं तर नाही,' तो जरा नाराजीनं म्हणाला. मी स्वत:शीच हसले. मनात आलेलं ताबडतोब बोलून टाकलं, पळवाट ठेवली नाही हे किती चांगलं केलं. माझ्यातलं जे सगळ्यात हीन, सगळ्यात क्षुद्र, त्याला सामोरं जाणं मला अशक्य होतं, आणि ते टाळण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे पळून जाणं.
 सोमवारपर्यंत न थांबता दुसऱ्या दिवशीच जगदीशला सांगायला गेले तर तो न्यूयॉर्कला पाठवायच्या पत्राचा मसुदा तयार करीत होता. त्यानं लिहिलं होतं की प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मी कॉन्फरन्सला हजर राहू शकतं नव्हते पण तो हजर राहणारच होता, आणि माझ्या संशोधनाशी त्याचा चांगला परिचय असल्यामुळं त्यांची हरकत नसल्यास तो माझा प्रबंध सादर करू शकेल.
 'तू जायचं ठरवलं होतंस हे ठाऊक नव्हतं मला,' मी म्हटलं. पण खरं म्हणजे ठाऊक असायला पाहिजे होतं. त्याचा संताप हा नुसता थिओरेटिकल नव्हता, एक फार मोठी निराशा झालेल्या माणसाचा संताप होता हे मला कळायला पाहिजे होतं. कारण मी ज्याला प्रेम म्हणते ते माझं दुसऱ्याशी असलेलं नातं सांगत नाही, फक्त माझ्या भावनेचं वर्णन करतं, स्वत:भोवती मला घोटाळवतं. ज्याच्यावर प्रेम असल्याचा मी दावा करते त्याच्याबाबतीत मग मी जास्त संवेदनाक्षम बनण्याऐवजी कमीच बनते.
 त्यानं शांतपणे विचारलं, 'आता ठाऊक झालंय तर तुला निर्णय बदलायचाय का?'
 मी मान हालवली. त्याचा ताठ झालेला चेहरा एकदम सैल पडला मी

कमळाची पानं । ५४