पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/67

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचं.' तिचा स्वर माझी समजूत घातल्यासारखा होता, लहान मूल जसं स्वत:ची निराशा झाली असताना दुसऱ्याचीच समजूत घातल्याचा आव आणतं तसा.
 मी डिपार्चर लाउंजमध्ये जायला उठले तेव्हा तिने हसून हात हलवून मला निरोप दिला. वळून प्लॅटफॉर्म हील्सवर सराईतपणे चालत झपाझपा ती बाहेरच्या दाराकडे निघाली. स्वयंचलित दारातून नाहीशा होणाऱ्या तिच्या आकृतीकडे पाहाता पाहाता एकदम मला वाटलं की ही चाल खरंच मजेत, आनंदात असलेल्या माणसाची आहे. रोमा ही एक एकसंध मुलगी आहे.
 मला माझंच हसू आलं. शब्दकोडं सोडवताना कधीकधी होतं तसंच हे झालं. एखादं कोडं अगदी सोपं वाटतं. शब्द भराभर सुचत जातात आणि मी ते घाईघाईने त्या लहान लहान चौकोनांतून भरत जाते. आणि मग एकदम एक असा शब्द येतो की तो त्याच्या आसपासच्या शब्दांत बसतच नाही. तो चुकला असावा म्हणून खूप विचार करकरूनसुद्धा त्याला पर्याय सापडत नाही. शेवटी नाइलाजाने तो बरोबर आहे असं कबूल करावं लागतं नि बाकीचे सोपे सोपे म्हणून सहजपणे भरलेले शब्द अर्थातच चुकीचे म्हणून खोडून टाकावे लागतात.
 मग एअरइंडियाच्या बादशहाच्या पोटात शिरून सीटबेल्ट आवळताना स्वतःला बजावलं, आता पुण्याला पोचलं की पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम जाऊन शनवारवाडा पाहायचा.

महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर १९७८


कमळाची पानं । ६७