पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/70

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुजबूज एकदम थांबायची. त्या तिची नजर चुकवायच्या. तिनं बाहेर जाणंच सोडलं शेवटी. पण घरात अखंड पुटपुटणाऱ्या सासूचा त्रास तिला वाचवता येईना. हे पुटपुटणं असह्य होऊन शेवटी ती सासूवर ओरडली,
 'तुम्हीच करणी केली माज्या पोरावर. देवा रे, मी हितं आल्येच नस्ते तर बरं झालं अस्तं.'
 'कूटं गेली अस्तीस ग सटवे? हां?' तिची सासू तिच्यासमोर उभी ठाकली. दोन पायांत अंतर, हात कमरेवर आणि भांडायला मोठी मजा येत असल्यासारख्या फुलारणाऱ्या नाकपुड्या. 'सांग की मला कुटं गेली अस्तीस त्ये? तुला कुटं घर हाय? आगं हुंडा न घेता केलीया तुला. छप्पनजणी तयार हुत्या. पन तुज्या चुलत्यानं फशीवलं माज्या शिरपतीला, आन् लगीन लावून दिलं.'
 'होऽऽ फसवलं म्हनं. काय बोळ्यानं दूध पीत व्हतं का तवा त्ये? चांगलं नीट बगूनबिगून केलीय माला.'
 'बगीतलीय म्हनं. आगं त्वांड बग सोताचं, आन् आईबापानं बगायच्या अगुदर नवऱ्यानं पोरगी पाह्यली आसं कंदी झालंय का? तुजी आन् तुझ्या चूलताचुलतीची पत काय हाय दिसतंयाच की आता. लाजशरम बी वाटंना जाली त्या चांडाळाला.'
 'अवो त्ये चांडाळ तर तुमचेच चुलतभाव हायेत' राधा फिस्सकन हसली 'चुलतभाव? त्यो कसला चुलतभाव? माज्या गळ्यात असलं लोढनं बांधनारा चुलतभाव न्हाईच माजा. वैरी हाय.' मग जरा ताळ्यावर येऊन ती म्हणाली, 'पन त्येची बी काय चूक हाये? ही तुज्यावानी बिना आयबापाची पोर जलमभर कोन पोसनार?'
 'तुमच्या जिभेला हाड हाय का न्हाय? माजं वडील जितं हायेत अजून. आन तुमी मला बिनमायेबापाची म्हंता?' राधाला खच्च झालं होतं.
 'हूं. जितं हायेत म्हनं. दिसभर खाटंवर पडून ऱ्हायचं बंडगुळावानी म्हंजी का जितं हायती? तेंचा काय उपेग हाय का कुनाला?'
 आता मात्र राधेला गप्प बसावं लागलं. तिची आई फार पूर्वीच वारली होती आणि काहीही काम न करता जगण्याच्या कलेत बाप अगदी निपुण होता. तो त्याचा पोरगा आणि पोराची कजाग बायको यांच्याकडे राहात होता.
 राधेला वाटायचं की त्या हृदयाच्या जागी मोठा दगडच असलेल्या आपल्या वैनीच्या घरी राहाण्यापेक्षा सासूकडे राह्यलेलं किंवा मेलेलं बरं.

कमळाची पानं । ७०