या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ शाबास, असेच कर्तव्यपरायण व्हा.”

 शिरीष आता नेहमी आनंदी असे. त्याचे दुःख दूर झाले. हेमाही आनंदली. शिरीष का आईबापांना विसरला? तो करुणेला का विसरला ? का शिरीषला वैभवाची चटक लागली ? का हेमासाठी तो वरवर हसत होता, परंतु अंतरी जळत होता ? काय होते खरे ?

 शिरीषची सर्वत्र वाहवा होऊ लागली. राजा यशोधराचे त्याच्यावर प्रेम जडले. राजधानीतील लोक शिरीषची मूर्ती दृष्टीस पडताच प्रणाम करीत: पतीची कीर्ती ऐकून हेमाचे पोट भरून येई.

 “ शिरीष जिकडे तिकडे तुझे नाव. परंतु माझे कोठेच नाही !” ती हसून म्हणाली.

 “ परंतु माझ्या ओठांवर तुझे नाव असते. लोक माझी पूजा करतात. परंतु मी तुझी करतो. खरे ना !” तो म्हणाला.


शिरीष ब हेमा * ३३