या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सा सू सा स ऱ्यां ची
स मा धी

♣ * * * * * * ♣








 दुष्काळ संपला होता. देवाला करुणा आली. आकाश भरभरून आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली.

 राजा यशोधराने दुसच्या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बियाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. गायीगुरे चरू लागली. परागंदा पाखरे पुन्हा येऊ लागली. गाऊ लागली. शेतकरी शेतात दिसू लागले. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.

 सुबत्ता आली. धान्य पिकले. करुणा सासूसासऱ्यास आता पोटभर जेवण वाढी. त्यांचे पाय चेपी. तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या. एक मामंजीच्या खाली तिने घातली. एक सासूबाईंच्या. ती म्हाताऱ्यांची दाई बनली, आई बनली.

 परंतु ती पिकली पाने आता गळणार असे दिसू लागले. सासूबाई एके दिवशी आंग धुऊन येत होत्या. तो त्या धपकन् पडल्या. करुणा त्या वेळेस घरात नव्हती. सासऱ्यानेच उठून सावित्रीबाईस घरात आणले, परंतु सावित्रीबाईस शुद्ध येईना.

 दुपारी करुणा घरी आली, तो हा प्रकार. ती धावत प्रेमानंदाकडे गेली. प्रेमानंद कसली तरी मुळी घेऊन आला. एक मात्रा घेऊन आला. परंतु कशाचा उपयोग नव्हता. सासूबाई देवाघरी निघून गेल्या होत्या.

 आता वृद्ध सुखदेव राहिले. तेही जणू आपली वाट पाहात होते.

-४२ * करुणा देवी