पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दीपाबाई
 


कामट्या व पट्ट्या यांची तर नावहि नव्हतें. फार काय सांगावे, इतक्या आजारी लोकांना जेवूं घालावयाचा, तर सैंपाकीणबाईना पुरेसें सरपण तरी दिलें पाहिजे, इकडेसुद्धां कोणी लक्ष देत नसे. ही सगळी परिस्थिति पाहून फ्लोरेन्सला वाईट वाटलें. तरी ती नाउमेद झाली नाहीं. तेथील अधिकारीवर्गाच्या पसंतीची किंवा गैरपसंतीची पर्वा न ठेवतां आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन ती झपाट्याने कामास लागली. जमिनी खरवडून काढण्यापासून रोग्यांना आंघोळी घालणें, त्यांचे कपडे बदलणें, त्यांच्या तोंड धुण्याची व्यवस्था करणे, मलमपट्या बदलणें, खिडक्या-दारें मोकळीं राहिलीं आहेत कीं नाहींत तें पाहणें, भटारखान्यावरचे उद्धट आचारी दुखणाइतांना अर्धकच्च्याच भाकऱ्या देत आहेत कीं काय हें पाहणें, येथपर्यंतचीं सर्व कामें या बायांनी आपल्या हातीं घेतलीं. तेथल्या त्या वतनदार अधिकाऱ्यांना प्लोरेन्स तेथें आली, हेंच आवडलें नाहीं. शस्त्रवैद्य इ. तर म्हणूं लागले कीं, ही आमच्या कामांत विनाकारण ढवळाढवळ करते. सरकारी सामानसुमानावरचा अधिकारी गर्जून तक्रार करूं लागला कीं, ही बाई सरकारच्या सामानाची नासधूस करते. यामुळे तिच्या कामांत थोडा व्यत्यय येऊं लागला. पण तिचा वशिला थेट युद्धमंत्र्यापर्यंत होता, हे आपण मागे पाहिलेलेच आहे. आणि खुद्द राणीसाहेबांनींहि तिला शाबासकी दिलेली होती. म्हणून तत्रस्थ अधिकऱ्यांना जुमानण्याचें आपणांस फारसें कारण नाहीं, असें ती समजे. शिवाय 'लंडन टाइम्स'चा बातमीदार, कीं ज्यानें इकडील हकीगतीचा भडका इंग्लंडांत उडविला होता, त्यानें वर्गणीच्या रूपानें जमा केलेला खूप पैसा फ्लोरेन्स हिला सहज मिळू लागला. तसेच, बरेंच सामानसुमान तिनें आपल्याबरोबर आणलेलें होतेंच. या साधनांच्या बळावर तिनें त्या जखमी लोकांची आणि दुखणाइतांची अशी उत्तम निगा राखली, कीं त्यांना खरोखरच सुख उत्पन्न होऊन ते तिला दुवा देऊं लागले.
 एकदां असें झालें कीं, इस्पितळांसाठीं सरकारांतून तिनें सदरे मागविले. थोड्याच दिवसांत सत्तावीस हजार सदऱ्यांचे गठ्ठे स्कुटारीस येऊन पडले, अधिकारी लोक हे गठ्ठे आज फोडतील, उद्यां फोडतील, असें फ्लोरेन्सला वाटत होतें. पण त्या निगरगट्ट अधिकऱ्यांनीं शुद्ध चालढकल चालविली. शेवटीं संतापून जाऊन बाईनें सगळा अधिकार आपल्या हातीं घेतला; व सदऱ्यांचे गठ्ठे फडाफड फोडून तिने ते दुखणाइतांना वांटून टाकले. इस्पितळाचे अधिकारी बऱ्या होत चाललेल्या शिपायांनासुद्धां रोग्याचेंच अन्न देत असत. त्यामुळे त्यांना लवकर शक्ति येत नसे.