तेथें तीहि त्याच्याबरोबर जाऊं लागली. माळावर घातलेल्या झोपड्या, आगगाडीची स्टेशने शेतकऱ्यांचे गोठे, यांचा सुद्धां आश्रय चँग-कै-शेकला कित्येकदां करावा लागे. मेलिंग ही अशा सर्व ठिकाणीं, त्याच्याबरोबर असे. सर्व देशभर अशी धावाधाव करतांना, आपल्या लक्षावधि देशबांधवांची अवस्था कशी केविलवाणी झाली आहे, दूरदूरच्या आणि मागासलेल्या टापूंत अज्ञान, घाण, आणि नैतिक ऱ्हास यांचा बुजबुजाट कसा झाला आहे, हें दोघांनीं प्रत्यक्ष पाहिलें. आणि मग, नवऱ्याच्या सैनिकी मोहिमेबरोबरच स्वच्छता, नीतिमत्ता आणि ज्ञान यांची एक स्वतंत्र मोहीम या बाईनें चालू केली. कित्येक शतकेंपर्यंत चिनी लोक अपसमजुती आणि मिथ्या ज्ञान यांत पिचत पडलेले होते. यांतून या सर्वांना सोडविण्यासाठीं तिनें ख्रिस्ती मिशनऱ्यांचीही मदत घेतली.
चँग-कै-शेक विमानांतून दूरच्या प्रदेशाची पाहणी करण्यासाठी निघाला, म्हणजे हीहि त्याच्याबरोबर जाई; आणि त्याची सैनिकी पाहणी एकीकडे चालू असतां, ही लोकांच्या करुणास्पद स्थितीची पाहणी करीत असे. लांबलांबचे किल्लेकोट, दरोडेखोरांच्या गढ्या आणि सहस्रावधि वर्षे नागर संस्कृतीचें मुखावलोकनही ज्यांनी केलें नाहीं, अशा मागासलेल्या लोकांचीं खेडीं हीं तिनें डोळ्यांनीं पाहिली. चीन देशाचे मोठ-मोठाले अधिकारी म्हणूं लागले, "हा नसता धंदा या बाईला कोणी सांगितला आहे? आणि हा वेडा पीरहि तिच्या नादानें, जेथें कोणीं कधीं गेलें नाहीं, तेथें जात राहतो! एकादे दिवशीं हे रानटी लोक या जोडप्याचें चंदन उडवतील."
परंतु चँग व मेलिंग या दोघांनाही असें वाटें कीं, विश्वासानें विश्वास वाढत जाईल; एवढालीं माणसें आपल्या दाराशीं आपण होऊन येत आहेत, तीं आपल्या बऱ्याकरतांच येत आहेत, हा विचार अडाणी जनतेला सुद्धां सुचेल, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. एका एका ठिकाणीं गेल्यावर, मेलिंग ही तेथील प्रमुख स्त्रियांना एकत्र बोलावून आणी; आणि त्यांना सांगे कीं, "तुम्ही घरांत बसून राहूं नका; बाहेर काय चाललें आहे, तें नीट डोळे उघडून पहा. जग बदलत आहे. तुम्हीं जागच्या हलल्या नाहींत, तर तुमचे संसार कुचंबतील; तुमचीं पोरें अडाणी राहतील; एकादा सवाई सोट त्यांच्या श्रमाचें फळ हिसाकावून नेईल."
पति-पत्नींचा हा कामाचा आवेश खरोखर पाहण्यासारखा होता. चीन देशांतील फुटीर वृत्ति चँगनें जवळ जवळ नाहींशीं केली; आणि मेलिंग हिनें अज्ञानी
पान:कर्तबगार स्त्रिया.pdf/२५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मादाम चँग-कै-शेक
२१