वगैरे कामे चालूच असत. बंगालमध्ये नेहमीं पूर येतात. गांवच्या गांवें वाहून जातात. मग दुष्काळ, रोग फैलावतात. अशा प्रसंगी निवेदिता आधीं धांवून जात. एकदां असाच पूर आला होता. रोगराई फैलावली होती. त्या पावसांत, त्या दलदलीत त्या गेल्या. सेवेस त्यांनी वाहून घेतलें; परंतु त्या अपार श्रमानें त्याच आजारी पडल्या. त्यांना हिवताप जडला. तो थांबेना. त्या कांहीं दिवस अमेरिकेंत जाऊन आल्या; परंतु हिंदुस्थानांत आल्यावर पुन्हां आजारी पडल्या. त्या काम करीतच राहिल्या. "पुन्हां परदेशांत जाऊन या." असें कोणी म्हटलें तर त्या म्हणत, "गरिबानें कोठें जायचें पुन्हां पुन्हां!"
प्रकृति फारच बिघडली. शेवटीं फारच आग्रह झाला, तेव्हां त्या दार्जिलिंग येथें गेल्या. स्वच्छ बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे पाहून त्या दुःख विसरत. परंतु आजार कमी होईना. मृत्यु जवळ आला तो दिवस उजाडला. उषःकाल होत होता. निवेदितादेवी म्हणाल्या, "तो पहा उषःकाल, तो पहा प्रकाश! तो भारताचा उषःकालही बघा, ती पहा नवभारताची प्रभा! भारताची नांव तीराला लागेल!" हेच शेवटचे शब्द. भाग्याचा उषःकाल बघत त्या देवाजवळ गेल्या. त्यांची नांव तीराला पोंचली. भारताची कधीं बरें पोचेल ?
पान:कला आणि इतर निबंध.pdf/१३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०