पान:कला आणि इतर निबंध.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



निबंध पहिला :

राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी



 हिंदुस्थानांतील राष्ट्रीय भावना कोणतें स्वरूप घेऊ पहात आहे? कोणता आकार घेऊ पहात आहे? स्वतःचीं कर्तव्यें, स्वतःचीं ध्येयें, स्वतःचीं आध्यात्मिकता पुन्हां एकदां आपलीशी करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वच दिशांनीं आज पुनर्रचना, पुनर्घटना करावयाची आहे. हें सर्व करीत असतां आपण राष्ट्र या पदवीस पोचूं. आपण आतां राष्ट्र बनूं लागलों आहोंत. आरंभ झाला आहे. कोणतीहि पुनर्घटना, कोणताहि फरक विध्वंसक स्वरूपाचाच असतो असें नाहीं. फक्त चुकीची पुनर्घटना, हेतुशून्य फरक हा मात्र मारक होत असतो. राष्ट्रीयतेचे ध्येय नैतिक व आध्यात्मिक स्थिरता देण्यासाठी आलें आहे. हें ध्येय आपणांस मुक्त करण्यासाठीं आलें आहे. आज ह्या राष्ट्रांतील कोणत्याही क्षेत्रांतील धडपड पहा. त्या धडपडींत आपण राष्ट्र व्हावें, ही भावना प्रामुख्याने दिसून येते. राष्ट्रीयतेचाच विचार स्पष्टपणे या धडपडीतून दिसतो. भारतांतील धडपडणाऱ्या मुशाफरांच्या समोर राष्ट्रीयतेचा ध्रुवतारा आज सारखा चमकत आहे.
 उदाहरणार्थ, आपण स्त्रीजातीची सुधारणा, स्त्रियांची स्थिति याचा विचार करूं या. स्त्रियांची जी संस्कृति आहे तिच्याकडे वळू या.