पान:कला आणि इतर निबंध.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
कला आणि इतर निबंध
 

स्त्रियांच्या संस्कृतींतहि नवीन दिशा आंखावयास हवी का? या बाबतींतहि मोडतोड करायला पाहिजे का? याहि गोष्टींत फरक करण्याची, बदल करण्याची जरूर आहे का? जर पाहिजे असेल तर कोणत्या बाबतींत? कोणती दिशा? आपण आज सारे धांवपळ करीत आहोंत, निराश होत आहोंत, नाशाकडे जणुं जात आहोत. या गोष्टीपासून आपण आपला आधी बचाव करून घेतला पाहिजे; आणि मग निश्चयानें व दृढ रीतीनें नीट सुसंघटित झालें पाहिजे, एकजीव झालें पाहिजे. आपण स्वावलंबी, स्वाश्रयी, स्वतःचें ध्येय समजलेले, स्वतःच स्वतःला प्रेरणा देणारे, असे झालें पाहिजे. थोडक्यांत राष्ट्रीय वृत्तीचे होण्याचा आपण दृढ निश्चय केला पाहिजे, हा दृढनिश्चय झाला म्हणजे मग कोणत्या दिशेनें प्रगति करीत जावयाचें, तें आपोआप दिसूं लागेल. फरक तर केलाच पाहिजे. सारे जगत् बदलत आहे, पुढें जात आहे. साऱ्या जगांतील राष्ट्रांच्या घडामोडी होत आहेत. मग भारतहि नवे नवे आकार, नवें नवें रूप धारण करणार नाहीं का? कात टाकलेल्या सर्पाप्रमाणें पुन्हां सतेज होणार नाहीं का? परंतु जे कांहीं फरक करावयाचे ते नीट विचारपूर्वक करावयाला हवेत. आपण स्वतःच्या इच्छेनें, स्वतःच्या मताने करायला हवेत. उगीच कोणाचें अंध अनुकरण करावयाचें नाहीं. आपण कोणाचे गुलाम होऊन नाचावयाचें नाहीं. स्वतंत्रपणे आपण आपल्या माड्या बांधू, घरे बांधूं. आज शेंकडों वर्षे, शतकानुशतकें आपल्या नारीजातीसमोर सीतासावित्री यांचे आदर्श आहेत; जिजाई, अहिल्याबाई, यांचे आदर्श आहेत. हे आदर्श सोडून आज आपल्या भगिनी काडीमोड करणाऱ्या होणार काय? त्यांना फुलपांखरें बनवायचीं काय? हिंदुस्थानांतील पद्मिनी जाऊन तिच्या जागीं ग्रीक हेलन येणार काय? फरक तर करायला हवाच आहे; फेरबदल केला नाहीं, तर हिंदुस्थानचा उज्ज्वल भूतकाल बुडून जाणार