पान:कला आणि इतर निबंध.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
१३
 

यांत शंका नाहीं. भूतकालीन संस्कृति टिकवण्यासाठींच फेरफार करावयाचा आहे. फरक तर केलाच पाहिजे त्याशिवाय तरणोपाय नाहीं; परंतु प्राचीन भूतकालीन गंभीरता, पूज्यता, शहाणपणा, हीं ठेवून त्यांत नवीन ज्ञानाची भर घालूं या. प्राचीन पवित्रता कांहीं झालें तरी गमावतां कामा नये. जें आधींच विशुद्ध आहे, निर्मळ आहे, त्याच्यावर जर आणखी जबाबदाऱ्या टाकल्या, त्याचें कार्यक्षेत्र जर विशाल केलें, तर तें अधिकच निर्मळ होईल. गंभीर ज्ञान आणखी गंभीरतर करू व या ज्ञानांतून नवीन उदात्त कोमलता निर्माण होईल. भावी भारतांतील मातांचे ध्येय भारतमाता ही थोर माता ठरवीत आहे; ती स्वतःच्या हातानें तें घडवीत आहे; अशी आपण हृदयांत श्रद्धा व आशा बाळगूं या. भावी भारतांतील मातांचें हें ध्येय अभिनव, सुंदर व रमणीय होईल. तें इतकें मनोहर व उदात्त होईल कीं, प्राचीन काळांतील ध्येयस्वप्नांची मेणबत्ती नवीन उदयोन्मुख अर्वाचीन साक्षात्काराच्या उषःकालासमोर फिकी पडेल, अंधुक वाटेल.
 आपणांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांतील स्त्रीशिक्षण हा एक झाला; परंतु सर्वच बाबतींत आपणांस नवीन प्रकाश निर्माण करावयाचा आहे, नवीन दिशा घ्यावयाची आहे, नवीन मार्ग पत्करावयाचा आहे. शिक्षण, शास्त्र, व्यापार, उद्योगधंदे सर्वत्र नवीन सर्चलाइट पाडावयाचा आहे. सामाजिक बाबतींत कोणत्या सुधारणा आधीं हव्यात, कोणत्या करणें योग्य, कोणत्या करणें अयोग्य, या बाबतींत आपण कितीतरी वेळ काथ्याकूट केला व कालापव्यय केला; परंतु या बाबतीत चर्चा करण्याइतकी पात्रताच आपल्यामध्ये नव्हती, ही त्यांतील खरी गोष्ट, आपणांस नीट ज्ञान नव्हतें, जबाबदारी आपण नीट ओळखीत नव्हतों व आपणांस विचार करण्यास अवसर नव्हता. परकीयांची टीका व सल्ला यांनाच