स्थान जर त्याला माहीत नसेल तर मात्र नुकसान होईल. कुंपणाशिवाय न वाढणाऱ्या लहान रोपाच्या भोवतालचे कुंपण काढून घेण्याप्रमाणें तें होईल.
भारताने केवळ प्राचीन कलेच्याच हांका ऐकावयाच्या, असें नाहीं; कलेमध्ये नावीन्य आणावयाचेंच नाहीं असें नाहीं; आपणांस बहिष्कार घालावयाचा नाहीं. परंतु भारताला कलेची परंपरा आहे; या परंपरेच्या शाळेत भारतीय मन शिकले आहे. भारतीय संस्कृतीत ही कला रंगलेली आहे; या कलेभोंवतीं भारतीय वातावरण उभारलेले आहे; इटली अथवा ग्रीस देशांतील कलेच्या भाषेत इथल्या लोकांजवळ बोलणे चुकीचें होईल, भारतीय चित्रकला, जर ती अभिजात भारतीय रहावयाची असेल, खरी भारतीय रहावयाची असेल व जर तिला थोर पदवीस जावयाचे असेल, श्रेष्ठ स्थान मिळवावयाचें असेल, तर त्या कलेनें भारतीय हृदयें हलवली पाहिजेत; भारतीय रीतीनें भारतीय मनाजवळ बोलले पाहिजे; जो विचार, जी भावना भारतीय मनाला परिचित असेल किंवा सहजगम्य असेल तीच चितारली पाहिजे, तीच चित्रद्वारां प्रकट केली पाहिजे; एवढेच नव्हे तर त्या कलेला परमोच्च स्थान द्यावयाचें असेल तर तिनें पाहणाऱ्याच्या मनांत अशी भावना उत्पन्न केली पाहिजे, असे कांहीं तरी दिव्यदर्शन त्याला घडवलें पाहिजे कीं, तें चित्र पाहून पाहणारा उन्नत होईल, त्याचें हृदय थोर होईल; परंतु हें सारें कला राष्ट्रीय असल्याशियाय होणार नाहीं; राष्ट्राच्या, आपल्या बांधवांच्या ज्या अभिरुची हजारों वर्षांनीं बनलेल्या आहेत, ज्या भावना त्यांच्या रोमरोमांत भिनलेल्या आहेत, त्यांचें साहाय्य घेऊनच कलेला हें अपूर्व ध्येय गांठतां येईल.
३
पान:कला आणि इतर निबंध.pdf/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
१७