पान:कला आणि इतर निबंध.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
१९
 

त्या देशांतील शब्दांचें चित्र हें काव्य असतें. ज्याप्रमाणें खरा हाडाचा कवि आपखुषीनें आपलीं काव्यें परकी भाषेत लिहिणार नाहीं, त्याप्रमाणें खरा कलावान अमर असे आपले कलेचे नमुने परकीय तऱ्हेचे करणार नाहीं; तर लोकांना समजणाऱ्या भाषेंतच, त्यांना समजल्या जाणाऱ्या चिन्हांनींच ते निर्माण करील; कारण खरें काव्य, खरें चित्र, खरें शिल्पकाम सर्व महान उद्गार हा हृदयांतून बाहेर आलेला असतो; ती हृदयाची हांक असते; पिळवटून आलेला तो हृदयोद्गार हृदयाला भिडूं जाऊं पहात असतो; समान हृदयाची सहानुभूति अपेक्षित असतो. हांका मारणारे लोक, हृदय पिळवटून आरडणारे लोक परकी भाषेंत हांक मारीत नाहींत. पोटतिडीक मायभाषेंतच बोलते.
 आपल्या कलेची पद्धत स्वराष्ट्रविशिष्ट आहे, स्थानविशिष्ट आहे, एवढ्यानें ती सकस मानवांच्या हृदयाला जाऊन भेटणार नाहीं असें नाहीं. उलट खरी कला कोणत्याही पद्धतीची असो, ती ज्याला ज्याला हृदय आहे, त्याला त्याला गहिंवरवील, त्याला तन्मय करील, ओरिसांतील दरवाजांची ढब परकीयाला साधणार नाहीं, तरी ती पाहून त्यालाहि आनंद होईल. जें खरें सुंदर आहे, तें सर्वांना समजतें. तारे सर्वांना आवडतात व दवबिंदु सर्वांना सुंदर दिसतात! फुलें व मुलें यांचीं गाणीं सर्वांनीं गायिलीं! तृणें व पांखरें कोणाला आवडलीं नाहींत? झरे, नद्या, सागर, यांनीं कोणाचें हृदय भरून आलें नाहीं? त्यांचें संगीत कोणी ऐकलें नाहीं? उषा नि निशा यांचें प्रशांत सौंदर्य कोणाला मुग्ध करीत नाहीं? खऱ्या सौंदर्याला कोठें प्रतिबंध नाहीं. पुराण ईजिप्तमधील मंदिरें त्यांचें अनुकरण आपणांस करतां येणार नाहीं, तरीहि जर आपण त्यांतील एखादें पाहिलें,