परंतु जी गोष्ट महान् आहे, विशाल आहे, व्यापक आहे, ती दुसऱ्या वस्तूंना मिळवून घेऊनहि स्वस्वरूप गमावीत नाहीं. सागर नद्यांना पोटांत घेतो— परंतु यामुळें तो क्षुद्र होत नाहीं. खरी थोर कला नवीन ज्ञानलब्धीनें भ्रष्ट होत नाहीं. तें नवीन ज्ञानहि ती आत्मसात् करते. या द्यूतदृश्याचें चित्र चितारणाऱ्याला जर थोडें शास्त्र माहीत असतें, वस्तु दूर असली, म्हणजे कशी हळूहळू अदृश्य होत जाते— दृष्टीची मध्यता कशी पहावी— हें जर त्याला समजतें— तर आणखीच सुंदर हें चित्र झालें असतें. या ज्ञानाचा परिणाम त्याच्या त्या चित्रावर झाला असता; परंतु यामुळे त्यानें आपली रंगविशुद्धता, रंगसौंदर्य हीं कांहीं गमावली नसतीं; किंवा वैभवता, विशालता, विपुलता व संपन्नता यांची त्याची आवड, तीहि त्यानें गमावली नसती; जणुं स्फूर्तीनें एखाद्याचा चेहरा दाखवणें, एखाद्याच्या मनाचा भाव स्पष्ट प्रगट करणें, किंवा चित्र अलंकृत करण्याची त्याची शक्ति— या त्यानें गमावल्या नसत्या. कलेमध्ये राष्ट्रीय रीत म्हणून कांहीतरी आहे. युरोपांतील कलेमध्यें जें शास्त्रीय ज्ञान असतें, तें फक्त भारतीय कलेनें मिळवून घ्यावें म्हणजे झालें. अशी कल्पना करून घ्यायला नको कीं, यथार्थता, बिनचूक यथार्थता ही केवळ पाश्चिमात्य कलेतच असते. कलकत्त्याच्या चित्रकला मंदिरासाठीं सतराव्या अठराव्या शतकांतील रामाच्या राज्याभिषेकाचें एक चित्र विकत घेण्यांत आलें. या लहानशा सुंदर चित्रांत सिंहासनाच्या पाठीमागें, अयोध्येचा प्रासाद दाखवला आहे व त्या प्रासादाच्या मागें नदी, नदीमधील नावा, शेतें, सैन्य वगैरे सर्व दाखवलें आहे. 'लखनौ-रीति' या चित्रांत आहे. या चित्रांतील यथार्थदर्शन, प्रमाणबद्धता, छाया व प्रकाश निर्दोष आहे सारें. भिन्न रंगछटांची एकता; उत्कृष्ट योजना व कल्पना; या बाबतींत तें उत्कृष्ट चित्रांच्या बरोबर मांडावयास कांहीं हरकत नाहीं.
पान:कला आणि इतर निबंध.pdf/२६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
२३