पान:कला आणि इतर निबंध.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
कला आणि इतर निबंध
 

अयोध्येतील राजवाड्याचें चित्र काढणारा हा अज्ञात महान् चित्रकार; त्यानें या चित्रांत काय दाखविलें नाहीं? बारीकसारीक सारी सृष्टि दाखवली आहे. असें चित्र मध्यकालीन डच चित्रकलासंग्रहांतहि नाहीं. राजवाडा स्वच्छ धवल संगमरवरी दाखवला आहे; तो मोकळा आहे; समोर आकाश पसरलेलें आहे! बृहदर्शक भिंगांतून या चित्राकडे जर आपण पाहूं, तर आपणांस चरणाऱ्या गायी दिसतील, तबेल्यांत जीन वगैरे घालून तयार राखलेले घोडे दिसतील, उंट आणि हत्ती आणि निशाण सारें यथास्थित रेखाटलें आहे. आणि लांब विस्तृत राजांगणें आणि दिवाणखाने क्षितिजाकडे मिळावयास जाणारे जणुं स्वप्नांतील स्वर्गपुरीच आपण पहात आहोंत, असें वाटतें.
 जर भारतीय चित्रकला अशा शिगेला पोचलेली आहे, तिचा असा विकास झालेला आहे, तिच्यामध्यें जर असे महत्तम विशेष आहेत, तर मग पाश्चिमात्य चित्रकलेनें भारतीय विद्यार्थी इतका का वेडावून जातो? कोणते असे पाश्चिमात्य कलेचे गुण आहेत? स्वतःचा मार्ग सोडून दुसऱ्या खटाटोपींत हा भारतीय छात्र का जात आहे? परकीय कलेत तो का ढवळाढवळ करूं रच्छितो, तिचें अनुकरण करूं पाहतो? पाश्चिमात्य कलेची त्यांना कल्पनाही नीट येत नाहीं व कल्पनाच नीट नाहीं, तर ती वठवतां तरी कशी येणार? भारतीय चित्रकला आज ना भारतीय ना पाश्चिमात्य! ती कलाच नाहीं; ती विकला होत आहे!
 पाश्चिमात्य चित्रांत यथार्थदर्शन असतें, सृष्टीशी जास्त सत्यरूप अशी ही कला आहे, म्हणून ती अति सुंदर व आकर्षक वाटते, असें भारतीय कलाभ्यासी म्हणेल. पाश्चिमात्य कलेची ही फारच तारीफ झाली, जास्त स्तुति