पान:कला आणि इतर निबंध.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
कला आणि इतर निबंध
 

रोमन नारी दिसत नसून मॅडोनाचेंच मन व स्वभाव दिसून येत आहे. चित्र म्हणजे फोटो नव्हे. कला म्हणजे शास्त्र नव्हे. निर्मिति म्हणजे अनुकृति नव्हे. लखनौ व कृष्णनगरच्या बाजारांतील मातीचीं चित्रहि शिल्पकलेचा उच्च नमुना दाखवतात; रमणीय असतात तीं चित्रे; परंतु सृष्टीशीं सत्य राहणें, यथार्थदर्शन कलेत घडवणें, ही जरी कलेची कसोटी धरली, तरी कोठे बिनसलें? लखनौच्या चित्रशाळेत अयोध्येच्या नबाबांच्या ज्या मोठमोठ्या तसबिरी आहेत, त्यांचे काय करावयाचें? या मोठमोठ्या तसबिरी लहान आकारावरून काढलेल्या आहेत; परंतु हे येथील आकार, किती भव्य आहेत काढलेले! अशीं भव्य चित्रे पाहिली होती कोणी अन्यत्र? दिल्लीहून पाठवलेला पहिला सुभेदार काळाकडे व सृष्टीकडे टक लावून पाहणारा, अनंत आशा ह्रदयांत खेळवणारा व मुखावर दाखवणारा, त्याच्या वेळेपासून तों शेवटच्या नबाबापर्यंत सारे तेथे चितारलेले आहेत. जणु ते जिवंत आहेत, असें वाटतें. सर्वांत कमी आकर्षक चित्र आसा उद्दौला मावळता त्या नबाबांतील सर्वात मोठा, त्याचें आहे; परंतु ते सारे तेथे चितारून ठेवलेले आहेत. त्यांचा तो एक पूर्वज जो अत्यंत सुंदर होता ज्याचीं चित्रे आजहि प्रेमाने लोक विकत घेतात व आपली अमोल वस्तु म्हणून मानतात त्याचेंहि चित्र तेथे आहे.
 सत्यदर्शन पाश्चिमात्य कलेतच आहे, असें नाही. इतरत्रही निरनिराळ्या तऱ्हेने सत्यार्थ प्रकट झालेला असलाच पाहिजे. एखादें थोर चित्र पाहून आपणांस जो आनंद होतो, तो 'निसर्गच हें चित्र रंगवीत आहे' या भावनेने होतो, ग्रिफिथच्या पुस्तकांत अजिंठ्याच्या चित्रांतील एक नमुना दिला आहे. एक नारी देवतेचे पाय धरीत आहे, असें तें चित्र आहे. ग्रीक चित्रकार मानवी देह जसा पहात, ज्या दृष्टीने पहात प्रमाण