पान:कला आणि इतर निबंध.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
कला आणि इतर निबंध
 

मग ती स्फूर्ति कोणाच्या का हृदयांतील असेना! परंतु भारतवर्षांत निराळें आहे. कला भारतवर्षांत जणु धंद्याप्रमाणे मानली गेली. मानली जाऊं लागली; ती कमीअधिक प्रमाणांत जातिनिविष्टच, जातिमर्यादितच झाली.
 वंशानुवंश त्याच जातींत ती कला येत असल्यामुळे हें पूर्वजांचें कौशल्य त्या त्या जातींत जमा होत राही. उदाहणार्थ, सुवर्णकारांची गोष्ट घेऊं. बाहेरचे कारागीर येतांच एकाएकीं येतांच सोनारांच्या अभिरुचीचा, कोशल्याचा, ज्ञानाचा अधःपात झाला, ही गोष्ट आपल्या लगेच लक्षांत येईल. त्याप्रमाणे रंगवण्याची कला; तिच्यांतही अधःपतन झालें आहे. वंशानुवंश जे धंदेवाईक कलावान होते, त्यांच्या अभिरुचि, त्यांचे नमुने दूर फेकले गेले; अननुभूत असे नवीन प्रकार आले. रंगाच्या बाबतींत जे अडाणी आहेत, रंगज्ञान, रंगाभिरुची ज्यांना नीट समजत नाही, अशा लोकांच्या अभिरुची आज समाजांत बोकाळल्या आहेत. जरी आजही भारतीय रंगकाम सुंदर व झळाळीत दिसतें, तेजस्वी दिसतें तरी पूर्वीची ती रंगकामांतील चारुता गेली व आज अशी स्थिती येऊं लागली. आहे, असले रंग व रंगकाम दिसतें की, आनंदाने हृदय हसण्याऐवजी रडूच येतें.
 परंतु त्याचबरोबर एक गोष्ट लक्षांत ठेवावयास हवी, ती ही कीं, जुन्या पद्धतींतील तोच-तोपणा नाविन्याचा अभाव, नवकल्पनांचा अभाव, यामुळेंहि जरा नवीन दृष्टीस पडतांच, त्या जुन्याचा एकदम सर्वांनीं त्याग केला. आपल्याच प्रतिभा-क्षीणतेनें आपलें कलासुभगत्व गेलें, आपले नमुने गेले; कारण जी कला एकाच जातींत रहाते, वंशानुवंश परंपरेने