एकाच जातींत चालत असते, तिच्यांतील नाविन्य जातें; तेच ते नमुने, तेच तेच प्रकार असे त्यांत होऊं लागतें; कला जणु रूढिबद्ध होते, दासी होते. ती स्वतंत्र रहात नाही; इकडेतिकडे उडत नाहीं. कलेचा आत्मा एकाच पिंजऱ्यांत शतकानुशतकें कोंडला जातो. मग समाजाचें मन, राष्ट्राचें मन बंड करतें; नवीन कलेच्या आदर्शाकडे, नवीन कलाविकासाकडे तें धावतें. चित्रकलेच्या बाबतींत तर हें निःसंशय सत्य आहे. दिल्ली, लखनौ येथील तसबिरी चांगल्या असतील; वंश परंपरा आलेल्या चिताऱ्यांकडून त्या काढलेल्या असतील; परंतु त्यांत नवीनता दिसत नाहीं; नवीनता निर्माण करण्याची शक्ति का कारागिरांच्या बोटांत व हृदयांत दिसत नाही. आकार काढण्याची नवीन रीत, नवीन ढब, त्या चित्रकारांना सुचेना; कारण जातीमुळे सवयी निर्माण होतात; सवयीने कौशल्य वाढतें, परंतु प्रतिभा व कल्पना मरून जाऊं लागतात.
कोणत्याहि एका जातीचे चित्रकार उद्याच्या राष्ट्रीय भारतांत राहणार नाहींत. कोठेहि चित्रकार उत्पन्न झालेला असो. या साऱ्या चित्रकारांचा जो संघ— त्या संघाचें पहिलें कर्तव्य हें आहे कीं, विशालता व कल्पनेची स्वतंत्रता यांची प्रथम पूजा करावयाची! हे नवभारताचे नव चितारी कलेचा विषय शोधून काढण्यांत बद्ध नाहींत; कोणतीही वस्तु, कोणतेंही दृश्य त्यांनी रंगवावें, व तें कशाही रीतीने रंगवावें. अमुकच पद्धतीने रंगवलें पाहिजे, काढलें पाहिजे असे नाही! ते मजूर आहेत, ज्याप्रमाणे त्यांचे वाडवडील मजूर होते. कारण सर्व चितारी बहुधा मजूरच असतात, श्रमजीवी असतात! परंतु ते श्रमजीवी असले तरी ते कवि आहेत. भविष्यकाळाचें दर्शन स्वतः घेऊन इतरांना घडवणारे ते ऋषि आहेत, तत्त्वज्ञ आहेत. ते भविष्यकाळांचीं स्वप्ने पहातात व रेखाट
पान:कला आणि इतर निबंध.pdf/३२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
२९