पान:कला आणि इतर निबंध.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राष्ट्रीय भावना निर्माण करण्यांत कलेची कामगिरी
३१
 

 समाजांत जेव्हां नवयुगोदय होत असतो, क्रांति होत असते, त्या वेळेस एकच विचार सर्वांच्या हृदयांत भरून राहिलेला असतो. 'समानी व आकुतिः समाना हृदयानि वः' अशी स्थिति आहे. सर्वत्र एकच सूर ऐकूं येतो, एकच दृश्य दिसतें. सर्वांचें एक मन, एक हृदय, एक ध्येय. ही जी ध्येयैक्यता, हेत्वैक्यता हा जो उत्साहपूर, तो कोपऱ्यांत बसलेल्या कलावानाला आपल्या भरतीबरोबर नाचवतो. तोहि या विराट् सिंधूंत डुंबूं लागतो. स्फूर्तिसागरांतील पटांवर नाचूं लागतो व तो राष्ट्राचा, राष्ट्राच्या अकांक्षांचा, राष्ट्राच्या हृदयाचा आविष्कार करणारा कलेश्वर होतो. तो राष्ट्राचें मन बोलतो, राष्ट्राच्या भावना बोलतो. शब्दांत त्या ओततो, रंगांत त्या रंगवतो, दगडांत त्या खोदतो- बांधतो! एलेफंटा येथील कोरीव लेण्यांला, अजिंठा येथील चित्रकलेला, कोठून आली भव्यता, दिव्यता, लोकोत्तरता? ते ते कलावान् काळाशी एकरूप झाले होते. तो वैभवाचा काळ होता. शब्दाला वाणीला स्वतःचें तेज व सामर्थ्य नाहीं. जी शक्ति त्या शब्दांतून खचून राहून बाहेर पडत असते, जी विद्युत् त्या शब्दद्वारा चमकत बाहेर येत असते. त्या शक्तीमुळे शब्दाला महत्त्व आहे. कलेचें तसेंच. भारतांत आज कलेचा पुनर्जन्म तरच होईल, जर भारताचें जें स्वप्न, आजचें राष्ट्रीयतेचें जें भव्य स्तव्य उदात्त स्वप्न त्या स्वप्नाची कला पूजक होईल, सेवक होईल, दासी होईल. कलेनें त्या स्वप्नाला स्वतःमधून प्रकट केलें पाहिजे. कलेनें पोकळ निरहंकार होऊन हे स्वप्न स्वतःमध्ये भरून घेतलें पाहिजे. ज्या वेळेस कलेमधून त्या त्या काळांतील आत्मा प्रगट होऊं लागतो, त्या वेळेसच कलेला कळा चढते, तेज चढतें. आज इंग्लंडमध्यें कला नाहीच म्हटलें तरी चालेल; कारण साम्राज्यरूढ सत्तेला काय मिळवावयाचें आहे,