पान:कला आणि इतर निबंध.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
कला आणि इतर निबंध
 

म्हणून चित्रकाराला पहिली अत्यावश्यक अशी गोष्ट आहे, ती ही की, त्याला दृष्टीला आनंद देता आला पाहिजे. दृष्टीचें स्वरूप त्याने ओळखलें पाहिजे. झटकन् त्याला निश्चय करतां आला पाहिजे. असें चित्र रंगवलें, येथे छाया दाखविली, येथें रंग जरा भडक दिला, तर आपणांस आवडेल की आवडणार नाही, हें ताबडतोब त्याला निश्चित करतां आलें पाहिजे. जर हें ज्ञान नसेल तर कला चुकेल. वाटेल तो देखावा कलेचा विषय नसतो. काय गाळावें हें कलावान जाणतो. हें जाणतो तोच कलावान. हल्लीच्या भारतवर्षांत तरी या गोष्टींवर जास्त जोर दिला पाहिजे. आज- काल वाटेल त्या वेड्यावाकड्या अभिरुची उत्पन्न होत आहेत; लोकांच्या अभिरुचीचा चुथडा होत आहे. चुकीच्या व भिकारड्या फॅशन्स अस्तित्वांत येत आहेत. अशा वेळेस लोकांच्या सदभिरुचीस जागृत करणें हें कलावानाचें काम आहे. 'सत्यं शिवं सुंदरं'ची कलावान उपासना करतो व राष्ट्राला करायला शिकवितो. आज हिंदुस्थानांतील प्रत्येक घरांत शकुंतलापत्रलेखन म्हणून एक चित्र टांगलेले असते. एक तरुण प्रमदा खुशाल आडवी पडून कमलपत्रावर पत्र लिहीत आहे, असें हें चित्र असतें. ह्या चित्रांतील तें द्दश्य भारतवर्षात तरी कुसंस्कारच निर्माण करण्यास उपयोगी पडेल. जें चित्र, जें दृश्य प्रत्यक्ष संसारांत जर आपण आज पाहिलें, तर विनयभंगाचें, शालीनताहीनतेचें म्हणून मानूं, तें कल्पनेंत तरी सुंदर कसें दिसेल? ज्या या भारतवर्षांत प्रेमविषयक प्रसंग कधीही प्रकट केले जात नसत समाजांत चव्हाट्यावर मांडले जात नसत, जेथे प्रेम झाकलेलें हृदयांत लपलेलें असेंच ठेवण्यांत आनंद वाटे त्या या भारतवर्षांत सुभद्राहरणाची व शकुंतलापत्रलेखनाचीं चित्रें घरोघर टांगली जात आहेत.