पान:कला आणि इतर निबंध.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कलेचा संदेश
३९
 

 खोट्या ध्येयांमुळे या चुका होतात, आपल्या हृदयांतील भावनांशीं आपण सत्यरूप, सत्यनिष्ठ राहिलें पाहिजे. जें चित्र काढीत असतां आपल्या स्वतःच्या, मनालाही फसवल्यासारखें होईल, तें चित्र आपण काढतां कामा नये. आजच्या काळांत या प्रेमस्वातंत्र्याच्या काळांत बंधनाच्या पलीकडील काळांत अशी चित्रे काढणेंच बरोबर, असें चित्रकाराला वाटतें, त्यांतच नवसंस्कृति आहे, असें त्याला वाटतें व पाहणाऱ्यालाही वाटतें. असल्या चुकीच्या समजुतीमुळे एका हिंदी मुलीला एका पाश्चिमात्य चित्रकाराच्या नग्न चित्रांचे कांही फोटो विकत घेतांना- ते रद्दी सौंदर्यहीन फोटो विकत घेतांना- मीं पाहिलें आहें. ती मुलगी म्हणाली, "सर्व चित्रांत हींच चित्रे मला फार आवडलीं!" त्या मुलीची सहृदय प्रेक्षकांस करुणा आली; त्यांनी मनांत कल्पना केली की, या मुलीने नीट विचार केलेला नाही; तिने विचारपूर्वक चित्रांची निवड केलेली नाही; परंतु तिने कल्पना करून घेतली की, "हीं चित्रे चांगलीं असणारच." एखाद्या हिंदी माणसाच्या बंगल्यांतही सिगारेट ओढणाऱ्या किंवा अशाच प्रकारें स्वतःची करमणूक करून घेणाऱ्या, मजा करणाऱ्या स्त्रियांची चित्रे टांगलेली आढळणे आता फॅशन झाली आहे! असली चित्रे जर दिवाणखान्यांत उघड लावून ठेवलीं, तर युरोपियन लोकांना अपमान वाटतो! ते या गोष्टीला हीन मानतात! असभ्य मानतात! युरोपियन घरांत अशीं चित्रे उघड्यावर बैठकीच्या ठिकाणी दिसली तर आपला जाणूनबुजून हा अपमान केला असें पाहुणा मानील!
 अशा चुका कां होत आहेत ? कारण आपण दगडासारखे भावना- शून्य बनून एखादी वस्तु सुंदर मानली जाते, उच्च कला मानली जाते, म्हणून आपणही त्या कलेच्या पाठोपाठ जाण्याचाच प्रयत्न करीत आहोत.