पान:कविता गजाआडच्या.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुन्न

सुन्न कोनफळी आभाळ
आतल्या आत सळाळणारं
कोसळण्याचा उन्मेषही हरवून गेलेलं...!
अशा आभाळाकडे पाहून,
बहरणारी झाडंही
कुचकं हसून पानं ढाळतात
नव्या पालवीचे चाळ झुमकावीत...
....
तेव्हा ,
अगदी दूरात उभं असलेलं
निष्पर्ण
वठलेलं झाड
मात्र,
गालात हळूच हसतं
आज नाहीतर उद्या...
कोसळणं हा तर
धर्म आहे आभाळाचा
पण
वठण्याचा सुन्न किनारा
फक्त
झाडांसाठीच!

कविता गजाआडच्या /४६