पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/20

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि बस येताच आत जाण्याकरता एकच गर्दी करतात! त्या हाणामारीत बुरख्यातील स्त्रियाही तितक्याच जोरकसपणे भाग घेताना दिसतात. या विभागातील ड्युटीला बसचा मुसलमान कंडक्टरदेखील कंटाळलेला असतो. बेशिस्त जमावाला तोंड देताना त्याला दिवसभर नकोसे होऊन जाते. या विभागातील प्रत्येक बसस्टॉपवर पाकिटमारांचे घोळके उभे असल्याचे त्याला माहीत असते. या बेशिस्तीचा फायदा घेऊन हे पाकिटमार मिळेल ती वस्तू मारतात आणि कधी कुणी सावध गि-हाइकाने आरडाओरडा केलाच, तर चट्कन चाकू काढून त्याच्या छातीवर रोखतात!
 'रामपुरी चाकू' नामक प्राणघातक शस्त्राची मुंबईत आयात रामपूरच्या मदनपुरा विभागात राहणाऱ्या मुसलमानांनीच केली!
 सन १९२८-३० च्या सुमारास मुंबईत पठाणांची दादागिरी बोकाळली होती. ते सावकारी करत, तसेच दादागिरीही करत. रामपुऱ्यांनी त्यांना आपल्या चाकूचे पाणी दाखवून सळो की पळो करून सोडले. पठाणांनी दादागिरीचा धंदा सोडून फक्त सावकारी धंदा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या दादागिरीचा वारसा रामपुऱ्यांनी उचलला. तो फार काळ टिकला नाही, परंतु त्यांच्या चाकूने मात्र मुंबईतल्या गुंडजगताला एक सर्वमान्य हत्यार मिळवून दिले. अशा प्रकारच्या दादांचा आणि गुंडांचा एके काळी मदनपुरा हा अड्डा बनला होता. तडीपार केलेले अनेक लोक पूर्वी मदनपुऱ्यात उघड वावरत असत. जवळच्या वेश्या-वस्तीमुळे वेश्यांचे दलाल आणि अफू, गांजा इत्यादी मादक पदार्थांचा धंदा करणारे या विभागात वावरत. आता त्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी रात्रीच्या वेळी एखादा फेरफटका मारल्यास गांजा भरलेल्या चिलमीचा फुटपाथवर बसून आस्वाद घेणारे तुम्हाला अद्यापही आढळतील.

 मदनपुरा ही उत्तर प्रदेशच्या मुसलमानांची मुंबईतील वसाहत आहे. त्या वस्तीचे पूर्वीचे स्वरूप आता राहिलेले नाही. उत्तर प्रदेशचे हे मुसलमान वेगवेगळ्या विभागांतून आलेले आहेत. त्यातील अल्प सुशिक्षित तेवढे अस्खलित उर्दू बोलतात; बाकीचे सारे आपापल्या विभागातील पुरभी, उत्तरी, अवधी, मगधी, भोजपुरी इत्यादी हिंदीच्या बोलीतून बोलतात. 'इन्किलाब', 'उर्दू टाइम्स' इत्यादी उर्दू वर्तमानपत्रे ते वाचतात. ते गिरण्यांतून, कारखान्यांतून किंवा जवळच्या कापडाच्या मागांतून काम करत असतात. ट्रेड युनियनचे राजकारण या विभागात चालत असते. ज्या पक्षांच्या कामगार संघटना असतात, त्या पक्षांना त्यांची निष्ठा वाहिलेली असते. उर्दूला मराठीप्रमाणेच राज्यभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, याकरिता याच विभागातून एखादा 'जुलूस' निघतो. फेरीवाल्यांच्या संघटनेसारख्या संघटनेचे मोर्चे येथीलच झूला नामक मैदानावरून निघत असतात आणि त्या

कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा । १९