पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/31

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यक्ष श्री. बलराज मधोक आणि खासदार अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या निवेदनांतील फरक फार महत्त्वाचा आहे. मधोक यांना हे लग्न होणे नापसंत होते; तर वाजपेयी यांचा आक्षेप ती मुलगी अज्ञान आहे, हा होता. सज्ञान मुलीला कोणाशीही लग्न करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट निवेदन वाजपेयी यांनी केलेले आहे. वाजपेयी यांच्या आणखी एका समतोल विचारांचे उदाहरण येथे देणे गैर ठरणार नाही. गेल्या भारत-पाक युद्धात राजस्थानमधील बारमेर सीमेवर राजस्थान आर्स कॉन्स्टिब्यूलरीच्या सैनिकांनी सीमेवरील काही मुसलमानांवर अत्याचार केल्याचे आणि काही स्त्रियांवर बलात्कार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणी समाजवादी नेते मधु लिमये यांनी लोकसभेत प्रश्न विचारायचे ठरवले आणि त्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची सही मागितली. श्री.वाजपेयी हे जनसंघाचे नेते आहेत, त्यांनी या प्रश्नावर सही दिली आणि कोणत्याही नागरिकांवर अत्याचार होणे मी चूक मानतो, अशी भूमिका घेतली.
 मला वाटते, ही भूमिका (म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, त्याचबरोबर मुस्लिम जातीयवादाला सतत विरोध करणे) मुस्लिम राजकारणाला वळण देण्याबाबत उपयुक्त ठरेल; त्यायोगे मुसलमानांत एका नव्या समंजस नेतृत्वाचा उदय होईल. आधुनिकतेचा संस्कार झालेले नवे मुस्लिम नेतृत्व ज्या क्षणी अल्पसंख्य-बहुसंख्य या जाणिवेतून विचार करायचे बंद करील, त्या क्षणी येथील मुस्लिम मनोवृत्तीत आपल्याला फरक झाल्याचे आढळून येईल!

राष्ट्र सेवादल पत्रिका :
 

दिवाळी १९६७
 

३० । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा