पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/59

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पहिले मौलाना मला स्टेशनपर्यंत पोचवायला आले. मला मीरतला जायचे होते. गाडी आली, तेव्हा मौलाना म्हणाले, “पुन्हा या. एक-दोन दिवस राहा इथे. तुमचेच घर आहे." मी “जरूर येईन' असे हसून म्हणालो खरा; परंतु आपण काही इथे पुन्हा येणार नाही, आपल्याला यावेसे वाटणार नाही, हे मनात आले. गाडीत बसलो तेव्हा, येथील गुदमरलेल्या वातावरणातून सुटका झाली म्हणून हायसे वाटले. त्याचबरोबर जे ऐकले आणि पाहिले, त्यामुळे फार उदास झालो! माझ्या विचारचक्राची गतीच थांबली. मीरत येईपर्यंत असाच बधिरपणे बसून राहिलो !


अलिगढ

५ सप्टेंबर १९६७

 हॉटेलात सामान टाकले आणि प्रथम किशनसिंगला शोधत गेलो. त्याचे पुस्तकाचे दुकान खूप मोठे आहे. खतिजाचा उल्लेख करताच त्याने मला अगत्याने बसवून घेतले. तिथे काही मुस्लिम विद्यार्थी होते. त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यातील एका विद्यार्थ्याचे नाव होते मुशीरूल हसन. तो महेबूबुल हसन या जामियामधील इतिहासाच्या प्राध्यापकाचा मुलगा. किशनसिंगने दुपारी पाच वाजता मला पुन्हा बोलावले. तो म्हणाला, “हे बघा दलवाईसाहेब, आम्ही कम्युनिस्ट असलो, तरी आमच्या सरंजामदारी संस्कृतीचा वारसा विसरलो नाही. दुपारच्या वेळी येथील रीती-रिवाजाप्रमाणे आम्ही झोप काढतो. तुम्ही पाच वाजण्याच्या आधी येऊ नका."
 मुशीरूल हसन आज बराच उपयोगी पडला. त्याने अनेक प्राध्यापकमंडळींची ओळख करून दिली. प्रा. बिलग्रामी हे किशनसिंगच्या पुस्तक दुकानाच्या वरच राहातात. त्यांनी घरीच नेले. अतिशय हलक्या आवाजात आणि अडखळत ते मला म्हणाले, “या विद्यापीठात पुरोगामी, प्रतिगामी, जातीयवादी, सेक्युलरवादी असे सगळेच तुम्हाला आढळतील. परंतु इथे अधिक प्रभाव जातीयवाद्यांचाच आहे. पुन्हा गंमत अशी की, बिचारे शिया तेवढे जरा व्यापक दृष्टीने विचार करणारे आहेत. तुम्हाला इथे शियांखेरीज फारसे पुरोगामी विचारांचे लोक आढळणार नाहीत."
 प्रा. बिलग्रामी हे शिया असल्याचे मला मागाहून कळले.
 श्री. आय. हसन हे प्राध्यापक इथे हिंदी आणि तत्त्वज्ञान शिकवतात. ते मला म्हणाले, “मी तरी मुसलमानांविषयी निराशावादी बनलो आहे. आणि त्यांच्या या जातीयवादी प्रवृत्तीबद्दल जीनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार धरावे लागेल. पाकिस्तान मिळाल्यावरदेखील हा मनुष्य बदलला काय? नाही!माउंटबॅटननी हैदराबाद आणि काश्मीरबाबत एक तोडगा सुचवला. नेहरूपटेलांनी तो मान्य केला, परंतु जीनांनी तो फेटाळून लावला. त्यांना सगळेच प्रदेश घशाखाली घालायचे होते!"

५८ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा