या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२. उद्दिष्ट मोजा, तपासा


 त्या ऑफिसच्या सान्या वातावरणात एक कुंद निराशा भरून राहिली आहे.तिथले लोक नुसते वेळ काढायला तिथे आले आहेत असंच त्यांच्याकडे पाहून वाटतं. कुणीतरी अंगावर कुठलं तरी ओझं दिलेलं आहे आणि काहीतरी करून कसंतरी आपलं काम आपल्याला ढकलायचं आहे असाच सर्वांचा समज आहे. हे सुद्धा तिथल्या ऑफिसमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला समजतं.
 एका मोठ्या, देशाच्या पातळीवर काम करणाऱ्या वित्तीय संस्थेचं ते विभागीय कार्यालय आहे खरं पण त्या साऱ्यांनाच ना कुठलं उद्दिष्ट आहे, ना काम करायची आंतरिक इच्छा. असं असल्यानेच तिथलं वातावरण असं निराशेचं अन् काम टोलवाटोलवीचं आहे. कारण कितीही काम केलं तरी त्यांच्या पगारात तर काही फरक पडणार नाहीच पण समजा काम केलंच नाही तरी काही होणार नाही.

 शिक्षा नाही अन् बक्षीसही नाही, पाठीवर थाप नाही अन् रागे भरणंही नाही. तिथं साऱ्या ऑफिसला निश्चित उद्दिष्ट असायला हवं. आणि त्याचप्रमाणे हवी छोटी पण कामाच्या नेमकेपणाची प्रत्येक टेबलासाठी उद्दिष्टे, जी मोजली जाऊ शकतील, तपासता येऊ शकतील.

कार्यशैली! १२४