पान:कार्यसंस्कृती.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वतःचा मृत्युलेख स्टिफन कोवे या माणसानं एकंदर अमेरिकन जीवनावर आणि कार्यसंस्कृतीवर फारच प्रभाव टाकला आहे. तो प्रभाव इतका आहे, की आता नुसता व्यवस्थापन तज्ज्ञ किंवा विचारवंत म्हणून त्याचा उल्लेख होत नाही, तर एक द्रष्टा माणूस म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानं त्याच्या पुस्तकात एक फार छान युक्ती सुचवली आहे स्वतःचं जीवन स्वतः तपासण्यासाठी. त्यानं असं म्हटलंय, की विचार करा आणि लिहा बरं, समजा तुम्ही आत्ता इथं मरण पावलात तर तुमच्यावर लोक काय लिहितील? आणि लिहिताना मनात काय आणतील? 'हा एक नालायक आणि कारस्थानी मॅनेजर होता' असं म्हणतील की हा एक सहृदयी आणि दुसऱ्यांचा मनापासून विचार करणारा व्यवस्थापक होता' असं म्हणतील? आपण जे काम. करतो आहोत त्यातनं आपण मागे काय सोडून जाणार आहोत? अविश्वास ? मत्सर ? द्वेष ? असूया की प्रेम? मैत्री? मोकळेपणा? आपण जिथं काम करतो आहोत तिथं आपण आपल्यामागे काय सोडून जात असतो याचा विचार आपल्या मनात सतत असावा असं कोवे म्हणतो. मी आणि मी निर्माण केलेल्या भावना यांचा हा विचार. ९ कार्यसंस्कृती