पान:कार्यसंस्कृती.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तीस सकंदांचं समाजदर्शन दुपारची कमी गर्दीची वेळ होती. दिवससुद्धा रविवारचा होता. मी चौकापाशी आलो. आणि लाल दिवा दिसला म्हणून थांबलो. तो सिग्नल तीस सेकंदांचा होता. पण त्या तीस सेकंदांत मला आपल्या कार्यसंस्कृतीचं अद्भुत दर्शन झालं. माझ्या मागोमाग एक रिक्षा आणि दोन गाड्या सिग्नल लाल होता तरी सरळ फर्रदिशी निघून गेल्या. बेपर्वा. एक गाडी आणि दोन स्कूटर्सनी गती हळू केली. चौकात पोलिस नाही हे पाहिलं, माझ्याकडे काय वेडा आहे असा कटाक्ष टाकला. आणि थोडं दबकत पण कायदा मोडून निघून गेले. संधिसाधू. एक रिक्षा थांबली खरी; पण दुसरे जातात म्हणून तीदेखील गेली. जिला स्वतःचं मूल्य नाही. दुसरे करतात म्हणून करणारी, अनुकरणवादी. माझ्यासोबत एक मोटारसायकलस्वार थांबला. ऐटीत कायदा पाळत. ज्या देशात कायदा आणि सुव्यवस्था मोडणारे बहुसंख्येनं आहेत त्या देशात दोन पंतप्रधान बंदुकीच्या गोळीला बळी पडले तर आश्चर्य वाटायला नको. १०७ कार्यसंस्कृती